आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजी बाजारात ‘डोअर टू डोअर’ कचरा हाेणार गाेळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वात जास्त ओला कचरा निर्माण होणाऱ्या भाजी बाजाराला दुर्गंधीमुक्त करण्याच्या हेतूने डोअर-टू-डोअर कचरा उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची २१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी होत आहे. या अनुषंगाने १८ नोव्हेंबरला आयुक्त अजय लहाने, उपायुक्त माधुरी मडावी यांनी भाजी विक्रेत्यांची बैठक घेतली. व्यावसायिकांनीही प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

जनता भाजी बाजारात ठोक भाजी बाजारासह किरकोळ भाजी विक्रेते आहेत. भाजी विक्रेते सडलेला भाजीपाला कचरा कुंडीत टाकतात. कचरा कुंडी अथवा कंटेनरची क्षमता कमी असल्याने कचरा विखुरतो. मोकाट जनावरे या ओल्या कचऱ्यावर ताव मारतात. तसेच या ओल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे भाजी खरेदी नाकाला रुमाल बांधूनच करावी लागते. भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात कचरा निघत असल्याने हा कचरा उचलणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन ओला कचरा, कचरा कुंडीत जमाच होऊ नये, यासाठीच प्रशासनाने व्यावसायिकांची बैठक घेतली.

या बैठकीत आयुक्त अजय लहाने यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रत्येक भाजी विक्रेत्याने निर्माण झालेला कचरा, कचरा कुंडीत टाकता दुकानाच्या बाहेर जमा करावा. हा कचरा घेण्यासाठी महापालिकेचे वाहन येईल, या वाहनात हा कचरा टाकल्यास तो थेट डंपिंग ग्राऊंडवर टाकला जाईल. त्यामुळे बाजारात कचरा साचण्याचा प्रकार बंद होऊन बाजार स्वच्छ दुर्गंधीमुक्त होईल.

परंतु, यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला थोड्या फार प्रमाणात शुल्क द्यावे लागेल. व्यावसायिकांनी सहकार्य केल्यास ही योजना यशस्वी होऊ शकते, असे आवाहन आयुक्तांनी केले. उपस्थित व्यावसायिकांनीही आयुक्तांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रत्येक व्यावसायिक ठेवणार डस्टबिन
ओला कचरा थेट ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी, ट्रॅक्टर येईपर्यंत भाजी विक्रेते ओला कचरा डस्टबिन, प्लास्टिक ड्रम अथवा पोत्यात जमा करतील. ट्रॅक्टर अथवा अॅपे वाहन आल्यानंतर हा कचरा थेट डंपिंग ग्राऊंडवर जाईल. यासाठी भाजी विक्रेत्यांना महिन्याकाठी ५० ते १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.