अकोला - स्वच्छपाणी ही आरोग्याची गरज आहे. अनेक आजार अस्वच्छ पाणी पिल्यामुळे होतात. त्यामुळे येत्या काळात अकोला शहरात जवळपास २०० शुद्ध पाणी आणि त्याच्या बरोबर टॉयलेटची व्यवस्था असलेले केंद्र महानगरपालिकेच्या साह्याने उभे करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुद्ध स्वच्छ पाणी केंद्राची सुरुवात आज जी. श्रीकांत यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अकोला महानगरपालिकेचे आयुक्त अजय लहाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश्वर कार्यकर्ते, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, भारत एक कदम प्रकल्पाचे संयोजक अरविंद देठे मंचावर उपस्थित होते. स्वच्छ पाण्याचा, सध्याचा बॉटल बंद पाण्याचा भाव २० रुपये प्रती लीटर एवढा आहे. एक लीटरच्या पिण्याच्या पाण्याची बॉटल विकत घेणे सामान्यांच्या खिशाबाहेर आहे. जमिनीतून उपसलेले पाणी पिण्यायोग्य नाही. त्यात खूप क्षार आहेत. त्यामुळे समाजातल्या सामान्यातल्या सामान्यांनाही स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात याची सुरुवात करण्यात आली असून, साधे स्वच्छ पाणी एक रुपया लीटर आणि थंड पाणी दोन रुपये लीटर देण्यात येणार आहे. ग्राऊंड वॉटरमधील प्रदूषणामुळे वाढत जाणारी क्षारता हा गंभीर विषय असून, जमिनीतले पाणी आज तरी पिण्यायोग्य नाही आणि
आपल्याला होणाऱ्या आजारांमध्ये पिण्याचे पाणी हा महत्त्वाचा घटक असल्याचे डॉ. राजेश्वर कार्यकर्ते यांनी सांगून शुद्ध पाण्याची गरज विशद केली. भारत एक कदमचे संयोजक अरविंद देठे यांनी हायजीन इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण हा प्रकल्प हाती घेतल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.
विविध ठिकाणी केंद्रे
शहरात आरओ जल विथ सॅनिटेशन केंद्र उभी करून "स्वच्छ सुंदर अकोला'साठी प्रयत्न राहतील. घराबाहेर पडल्यानंतर टॉयलेटसाठीचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. हे लक्षात घेत त्यांच्यासाठीही वेगळी व्यवस्था केंद्रांच्या मागे राहील.अत्यल्प किमतीत पाणी आणि त्याबरोबर टॉयलेटची व्यवस्था हे मॉडेल म्हणून अकोल्यात सुरू करू आणि ते निश्चितच राज्यातही लोकप्रिय होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या वेळी व्यक्त केली.