आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ टक्के जलसाठा कमी, ६४ खेडी योजनेला डावलण्याचा डाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरासह विविध पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत २६ टक्के जलसाठा कमी आहे. त्यामुळे या महिन्यात होणाऱ्या पाणी आरक्षणाच्या बैठकीत विविध योजनांसाठी पाण्याचे आरक्षण करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरासह विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांना तसेच मत्स्यबीजपालन केंद्राला पाणीपुरवठा केला जातो, तर या प्रकल्पातून आठ हजारांपेक्षा अधिक हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाते. त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पावर जिल्ह्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. परिणामी, मान्सून परत गेल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात काटेपूर्णासह विविध प्रकल्पांतील जलसाठा लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजना आणि सिंचनाचे नियोजन केले जाते. प्रकल्पात जलसाठा कमी असेल तर सिंचनासाठी पाणी देता केवळ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी आरक्षित केले जाते. हे आरक्षण १५ जुलैपर्यंत केले जाते.

ऑक्टोबर २०१४ ला काटेपूर्णा प्रकल्पात ३३.८५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होता. यापैकी पाणीपुरवठा योजनांसाठी २२.१९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. मागील वर्षी अकोला पाणीपुरवठा योजनेसाठी नोव्हेंबर २०१४ ते १५ जुलै २०१५ या कालावधीसाठी १४.४९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले होते. या आरक्षित पाण्यातून शहराला तंतोतंत पाणीपुरवठा करता आला. परंतु, दुर्दैवाने या वर्षी ऑक्टोबर महिन्यात काटेपूर्णा प्रकल्पात २४.७९ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातून पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच इतर लॉसेस लक्षात घेऊन पाणी आरक्षणाच्या बैठकीत विविध योजनांसाठी २२.१९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करावे लागणार आहे. या महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होऊ शकते. या अनुषंगाने अकोला पाटबंधारे विभागाने विविध पाणीपुरवठा योजनांकडे उर्वरित.पान
जुलै२०१६ पर्यंत पाणी आरक्षणाचा आकडा मागितला आहे. त्यामुळे पाण्याचे आरक्षण करताना पालकमंत्र्यांसह विविध अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

६४ खेडी योजनेला डावलण्याचा डाव
काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याचे आरक्षण करताना महापालिकेला अधिकाधिक पाणी आरक्षण मिळावे, यासाठी ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण रद्द करून या योजनेला सुकळी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे. ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण रद्द केल्यासच महापालिकेला १४.४९ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मिळू शकते.
६४ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडा
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तूर्तास खांबोरा उन्नेयी बंधाऱ्यात फूट इंच पाणी आहे. हे पाणी ११ फूट करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

निष्काळजीपणा भाेवणार
मागीलवर्षाच्या तुलनेने काटेपूर्णा प्रकल्पात साठा कमी असताना त्याकडे दुर्लक्ष करून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे नागरिक अथवा नगरसेवक यापैकी कोणीही अशी मागणी केलेली नाही. परंतु, तरीही हा प्रयोग सुरू असल्याने मनपाला हा निष्काळजीपणा पुढील काही महिन्यात भोवण्याची शक्यता अाहे.

मनपाने केली १४.४९ दलघमीची मागणी
जुलै२०१६ पर्यंत शहराला पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने अकोला महापालिकेने अकोला पाटबंधारे विभागाकडे १४.४९ दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी केली आहे. ही मागणी पाणी आरक्षणाच्या बैठकीत मंजूर केली जाते का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तांत्रिक अडचण
सुकळीप्रकल्पातून ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे आरक्षण काटेपूर्णा प्रकल्पातून रद्द केल्यास ६४ गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते.
काटेपूर्णा प्रकल्पातून ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला नदीच्या माध्यमातून पाणी सोडावे लागते. यात लॉसेस मोठ्या प्रमाणात होतात. परंतु, तरीही सुकळी प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन ६४ खेडी योजनेसाठी काटेपूर्णा प्रकल्पातून १५ दिवस पाणीपुरवठा होईल, एवढे पाणी सोडावेच लागेल.'' रणधीरसावरकर, आमदार