आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... अन्यथा सुकळी प्रकल्पातून पाणीपुरवठा करणे झाले असते शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अधिकाऱ्यांनीजबाबदारीने कर्तव्य बजावले, तर विविध योजना मार्गी लागतात. मात्र, दुर्लक्ष केले की, सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या योजनेचीही वाट लागते. याचा प्रत्यय ६० खेडी पाणीपुरवठा योजनेमुळे आला. या योजनेला सुकळी प्रकल्पातून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ९३ लाखांची योजना आमदार रणधीर सावरकर यांनी मंजूर करून आणली. सर्व कामेही झाली. परंतु, पावसाळ्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी घेतल्याने पंप पाण्यात बुडाले. आता पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने प्लॅटफार्म तयार करावा लागणार आहे.

काटेपूर्णा प्रकल्पातून खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेत ६४ खेड्यांचा समावेश असल्याने याला ६०, तसेच ६४ खेडी पाणीपुरवठा योजना म्हणतात. गेल्या काही वर्षांतील काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा लक्षात घेता तसेच या योजनेसाठी नदीच्या माध्यमातून पाणी सोडताना होणारे लॉसेस या बाबी लक्षात घेऊनच नव्याने बांधलेल्या सुकळी संग्राहक तलावातून ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करता यावा, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासनाकडून ९३ लाख रुपयांची योजना मंजूर करून आणली. या निधीतून पंप, इलेक्ट्रिक पोल, मुख्य जलवाहिनीपर्यंत ९०० मीटर लांबीची पाइपलाइन आदी सर्व कामे करण्यात आली. या वेळी काटेपूर्णा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्याने या वर्षी सुकळी प्रकल्पातून ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणे शक्य होते. परंतु, दुर्दैवाने पावसाळ्यापूर्वी सुकळी संग्राहक तलावांतर्गत पाणीपुरवठा व्हावा, याअनुषंगाने केलेल्या कामाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सुकळी संग्राहक तलावाने जलसंचयाची पातळी १०० टक्के गाठली. त्यामुळे बसवलेले पंप पाण्याखाली गेले. त्यामुळे आता पाणीपुरवठा करायचा असेल, तर नव्याने प्लॅटफार्म तयार करावा लागणार आहे. त्यासाठी पुन्हा कागद काळे करावे लागणार आहे. या मंजुरीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, काही महिने जाण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी काळजी घेतली असती, तर कदाचित आॅक्टोबर महिन्यापासून सुकळी प्रकल्पातून पाणीपुरवठा करणे शक्य होते.