अकोला - जिल्ह्यातपावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अद्याप या पावसामुळे कोणत्याही प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झालेले नसून जलसाठ्यात वाढ होण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
२०१३ ला जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे जलप्रकल्प तुडुंब भरले होते. परंतु, लाखो रुपयांची हानी झाली होती. २०१३ ला अतिवृष्टी झाल्यानंतर २०१४ ला मात्र पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे तुरळक प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षाही कमी साठा उपलब्ध झाला. परिणामी, दिवाळीपासून पाणीटंचाईची घंटा वाजू लागली होती. जिल्हा प्रशासनाने एक नोव्हेंबरला जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील जलसाठा लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी विविध पाणीपुरवठा योजनांसाठी आरक्षित केले होते. जून महिन्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे या वर्षी मुबलक पाणी उपलब्ध होणार, अशी अपेक्षा व्यक्त केल्या गेली होती. परंतु, जून महिन्यात हजेरी लावलेल्या पावसाने मात्र नंतर चांगलीच गुत्ती मारली. त्यानंतर थेट पावसाने २० जुलैला हजेरी लावली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कुठे जोरदार, कुठे रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही भागातील पिकांना जीवदान मिळाले खरे, परंतु जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात मात्र वाढ झाली नाही.
जलप्रकल्पांत वाढ होण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यासच जलप्रकल्पांच्या पातळीत वाढ होऊ शकते. पावसाने दांडी मारल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
जिवंत साठाही नाहीच : ३२लघू प्रकल्पांपैकी १५ लघू प्रकल्पांत मृतसाठा शिल्लक राहिला होता. काही दिवसांपासून झालेल्या पाण्याने प्रकल्पांत जिवंत साठाही उपलब्ध होऊ शकला नाही. उलट काही लघू प्रकल्पांची वाटचाल मृतसाठ्याकडे सुरू आहे.
येरे-येरे पावसा पण वाशीम जिल्ह्यात
सर्वातमोठ्या काटेपूर्णा प्रकल्पावर जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पाच्या पातळीकडे सर्वांचे लक्ष लागले असते. परंतु, जिल्ह्यात कितीही जोरदार पाऊस झाला तरी काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मेडशी, मालेगाव, वाशीम या भागात जोरदार पाऊस होणे गरजेचे आहे. त्यामुळेच तूर्तास येरे-येरे पावसा पण वाशीम जिल्ह्यात, असे म्हणण्याची वेळ अकोलेकरांवर आली आहे.