आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५७ लाखांचा भरणा केल्यास पाणीपुरवठा होऊ शकतो सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेने भौरद ग्रामपंचायतीला ५७ लाख ४२ हजार रुपयांच्या अनामत रकमेचा भरणा केल्यास पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, आर्थिक अडचणीमुळे एक वर्षाऐवजी तीन महिन्यांची अनामत रक्कम आकारावी, अशी मागणी भौरद ग्रामपंचायतीच्या वतीने केली जाणार आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेली भौरद पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षांचा कालावधी झाला आहे. परंतु, अद्यापही महापालिकेची हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढ झाल्याने महापालिका क्षेत्रालगत वसलेल्या उपनगरातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याचा बोजा महापालिकेला सहन करावा लागत आहे. मलकापूर, भौरद, शिवणी, शिवर आदी गावांची हद्द आणि महापालिकेची हद्द यात काहीच अंतर राहिलेले नाही. मलकापूर गावाला अकोला पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. याच धर्तीवर भौरद ग्रामपंचायतीने महापालिकेकडे अकोला पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. यासाठी महाजल योजनेतून जलवाहिनी आणि जलकुंभ उभारण्यासाठी भौरद ग्रामपंचायतीला दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधीही मिळाला. २००८ ला मंजूर झालेल्या योजनेतून २०११ ला मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे आणि सहा लाख ५० हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचे कामही पूर्ण झाले. अकोला पाणीपुरवठा योजनेतील शिवनगर भागातील जलकुंभातून भौरद ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्तावही महासभेने मंजूर केला आहे. महापालिकेने प्रस्ताव मंजूर करताना पाच वर्षांची पाणीपट्टी अनामत रक्कम म्हणून आकारण्याचे आदेश दिले होते. परंतु, आर्थिक परिस्थिती पाहून पाणीपुरवठा विभागाने केवळ एक वर्षाची पाणीपट्टी अनामत रक्कम म्हणून भरण्याची नोटीस जारी केली आहे. अद्याप भौरद ग्रामपंचायतीने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी एक वर्षाऐवजी तीन महिन्यांची पाणीपट्टी अनामत रक्कम म्हणून स्वीकारावी, असे पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा गुंता सुटल्यास भौरदवासीयांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली लागू शकतो.

मनपाचाही भार कमी होणार
महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या भौरद ग्रामपंचायतीची लोकसंख्या २८ हजार आहे. या भागातील बहुतेक सर्व नागरिक शिवनगर येथील जलकुंभावरून पिण्यासाठी पाणी घेऊन जातात. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केला नसला, तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या वतीनेच या भागाला पाणी दिले जात आहे. विशेष म्हणजे तेही फुकटात. त्यामुळे भौरद पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास महापालिकेचाही भार कमी होईल. त्याच बरोबर महापालिका क्षेत्राच्या ज्या भागात पाणीपुरवठ्याची सोय नाही, त्या भागातील नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

मलकापूरकडे साडेसात कोटी थकित : महापालिकाक्षेत्रालगत असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतीलाही अकोला पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मलकापूर ग्रामपंचायतीकडे सात कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम अनेक वर्षांपासून थकली आहे. या थकित रकमेचा भरणा अद्यापही मलकापूर ग्रामपंचायतीने केलेला नाही.

दरडोई ४० लीटर पाणीपुरवठा : अकोलापाणीपुरवठा योजनेतून भौरद ग्रामपंचायतीला दररोज ११ लाख लीटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. म्हणजेच महिन्याकाठी तीन कोटी ३० लाख, तर वर्षाकाठी ३९ कोटी ६० लाख लीटर पाणीपुरवठा भौरद ग्रामपंचायतीला होईल. भौरद ग्रामपंचायतीची लोकसंख्या लक्षात घेता, दरडोई दररोज ४० लीटर पाणीपुरवठा नागरिकांना दिला जाणार आहे.

गुंतात्वरित सोडवावा : पाणीपुरवठायोजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. हा गुंता त्वरित सोडवून नागरिकांना ग्रामपंचायतीने त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक महादेव बेलोकार यांनी केली.

प्रती हजारासाठी १४.५० पैसे : प्रतीएक हजार लीटरसाठी १४ रुपये ५० पैसे दराने पाणीपट्टी आकारली आहे. मनपाने कमर्शियल दराने पाणीपट्टीची आकारणी केली असती, तर भौरदला प्रती हजार लीटरसाठी ५० रुपये याप्रमाणे भरणा करावा लागला असता.

पाच वर्षांपासून प्रतीक्षा
रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे, तर समोर जलकुंभही दिसत आहे. परंतु, पाणीपुरवठा ठप्प अशी स्थिती पाच वर्षे होऊनही बदललेली नाही. त्यामुळे पंच पक्वान्नाचे ताट समोर ठेवलेले आणि हात बांधलेले, अशी अवस्था भौरदवासीयांची झाली आहे.

डिमांड नोटीस बजावली
^भौरद ग्रामपंचायतीला ५७ लाख ४२ हजार रुपयांची अनामत रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे. अद्याप उत्तर आले नाही. यापूर्वी पाणीपुरवठा केलेल्या ग्रामपंचायतींकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.'' अजयगुजर, शहरअभियंता, महापालिका, अकोला

तीन महिन्यांची मागणी करणार
^ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, एकाच वेळी रकमेचा भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे तीन महिन्यांची जेवढी पाणीपट्टी होईल, ती रक्कम अनामत म्हणून घेऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली जाईल.'' डॉ.सुभाष लव्हाळे, अध्यक्ष,महाजल योजना, भौरद.

फायदा मनपाचाच
हद्दवाढ झाल्यास २७ गावांचा समावेश महापालिका क्षेत्रात केला जाणार आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासह विविध योजना राबवाव्या लागणार आहेत. मलकापूरसह भौरद ग्रामपंचायतीने जलकुंभासह जलवाहिन्या टाकण्याचे केलेले काम पुढे महापालिकेसाठी फायद्याचेच ठरणार आहे.

जलकुंभ बांधण्याचे काम पूर्ण
२००८ला मंजूर झालेल्या योजनेतून २०११ ला मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे, सहा लाख ५० हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचे कामही पूर्ण झाले.