आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३ लघू प्रकल्पांमध्ये "डेड स्टोरेज',मार्चमध्ये ३४.५० टक्के पाण्याचे झाले बाष्पीभवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील३२ लघू प्रकल्पांपैकी १३ लघू प्रकल्पांनी मृतसाठ्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला एप्रिल महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत, तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातही केवळ १०.०० दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक राहिला आहे.
जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम, तर ३२ लघू प्रकल्पांच्या माध्यमातून नागरिकांची तहान तसेच सिंचनासाठी पाणी दिले जाते. त्यामुळे हे सर्व प्रकल्प जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती निश्चित करतात. रब्बी हंगामात पाणी मिळाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या वर्षी निर्गुणा प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांतून सिंचनासाठी फारसे पाणी सोडता आले नाही, तर काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी केवळ बिगर सिंचनासाठी आरक्षित केले. त्यामुळे या वर्षी रब्बीच्या हंगामात अल्पशी उलाढाल झाली. त्यामुळे एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ३२ लघू प्रकल्पांपैकी १३ लघू प्रकल्पांनी "डेड स्टोरेज' गाठल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

हेलघू प्रकल्प "डेड स्टोरेज'च्या मार्गावर : झरंडी,तामसी, गावंडगाव, मोऱ्हळ, कानडी, जनुना, इसापूर हे सात प्रकल्पही "डेड स्टोरेज'च्या मार्गावर आहेत. या प्रकल्पात केवळ ०.०१ ते ०.०५ दलघमी जलसाठा राहिला आहे. होणारा वापर बाष्पीभवनामुळे लवकरच या लघू प्रकल्पांचा समावेश "डेड स्टोरेज'च्या यादीत हाेऊ शकताे.

हेलघू प्रकल्प "डेड स्टोरेज' : सिसाउदेगाव, पिंपळशेंडा, पिंपळगाव चांभारे, सावरखेड, घोंगा, झोडगा, हातोला, तुलजापूर, सावरगाव बांध, दगडपारवा, विश्वामित्री, सुकळी, शिवण खुर्द या प्रकल्पांनी "डेड स्टोरेज' गाठले आहे.