आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाअभावी उभे ठाकले पाणीटंचाईचे भीषण संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- मागीलवर्षी झालेला अत्यल्प पाऊस, दिवसागणीक खोल जात असलेली भूजल पातळी, तसेच मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भर पावसाळयात जिल्ह्यातील १६ गावांसाठी २६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पुढील काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्यास आगामी काळात टँकरग्रस्त गावांमध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात जल प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना खरिपावरच समाधान मानावे लागले होते. या वर्षी जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे पाणीटंचाईपासून सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु, महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे ही अपेक्षाही धुळीस मिळाली आहे. दिवसागणीक खोल जात असलेल्या पाणी पातळीमुळे विहिरी बोअर शेवटच्या घटका मोजत आहेत. मध्यम लहान प्रकल्पाच्या पाणी पातळीत घट होत असून, अनेक लघू प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे.

सध्या भर पावसाळ्यात जिल्ह्यातील १६ गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. यावर उपाय योजना म्हणून जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांसाठी २६ टँकर मंजूर केले आहेत. या टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे. तसेच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने ३१० विहिरी मंजूर करून त्यापैकी २४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच ८९ गावात १४१ विंधन विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, अशीच स्थिती कायम राहिल्यास आगामी काळात पाणीसमस्या अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
पाणी टंचाई ग्रस्त गावे
मलकापूर
मलकापूर ग्रामिण, गाडेगाव वाकोडी
संग्रामपूर कवठळ
सिंदखेडराजा
सोनोशी, मलकापूर पांग्रा, पिंपळगाव
लोणार
मातमळ, पिंपळखुटा, किनगाव जट्टू, पार्डा दराडे
देऊळगावराजा
धोत्रानंदई
चिखली
अंत्री खेडेकर
बुलडाणा
हनवतखेड
तालुका गावे

चार गावांत टँकर बंद
काहीदिवसांपूर्वी दमदार पाऊस झाल्याने चार गावांमधील टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये देऊळगावराजा तालुक्यातील गोंधणखेड, मेहकर तालुक्यातील हिवरा, सिंदखेडराजा तालुक्यातील आडगावराजा आणि मलकापूर तालुक्यातील खामखेड या चार गावांचा समावेश आहे.

बाराही महिने टँकरग्रस्त असलेले गाव हनवतखेड
शहरापासूनअवघ्या काही अंतरावर अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेल्या हनवतखेड या गावाला बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरचे पाणी गावाच्या बाजूला असलेल्या खोल दरीतील एका विहिरीत सोडण्यात येत आहे. त्यानंतर त्या विहिरीतून पाणी काढून नागरिकांना आपली पाण्याची गरज भागवावी लागत आहे. डोक्यावरून पाणी आणण्यासाठी महिलांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...