आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील लहान, मोठे प्रकल्प अद्यापही तहानलेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी टाकली. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प तहानलेले आहेत. सद्यस्थितीत या प्रकल्पात ६६.३७ दलघमी साठा असून त्याची टक्केवारी १२.४४ एवढी आहे. विशेष म्हणजे ८१ लघु प्रकल्पांपैकी ४१ लघु प्रकल्प पाण्याअभावी कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. परिणामी आजच्या स्थितीत ५९ गावांना ६९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 
 
जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा पेन टाकळी असे तीन मोठे प्रकल्प असून पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा उतावळी असे मध्यम प्रकल्प आहेत. तर जिल्ह्यात एकुण ८१ लघु प्रकल्प आहेत. मोठा प्रकल्प असणाऱ्या नळगंगा प्रकल्पातून मोताळा शहरासह ४० ते ५० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच पेन टाकळी प्रकल्पावरून मेहकर चिखली तालुक्यातील असंख्य गावांना तर मध्यम प्रकल्प असलेल्या पलढग धरणावरून कोथळी, खरबडी तरोडा गावासह सात गाव पाणी पुरवठा राबवण्यात येत आहे. याशिवाय सर्वच मध्यम प्रकल्पावर सात गावे, बारा गाव विस गावांसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. परंतु मागील वर्षी पावसाचे झालेले अत्यल्प प्रमाण, उन्हामुळे झालेले पाण्याचे बाष्पीभवन, सिंचनासाठी झालेला पाण्याचा भरमसाट वापर, यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम लघु प्रकल्पाच्या जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. वास्तविक पाहता यंदा पावसाला वेळेवर सुरुवात झाली. परंतु पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील जिल्ह्यात दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यास पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प तहानलेले आहेत. सद्यस्थितीत या प्रकल्पात नाममात्र १२.४४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. तर मध्यम प्रकल्प असलेल्या मन तोरणा प्रकल्प शेवटच्या घटका मोजत असून या प्रकल्पात ९.५८ ६.४६ टक्केच एवढाच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पांपैकी तब्बल ४१ प्रकल्प पाण्याअभावी कोरडे पडले. त्यामुळे भर पावसाळ्यात या गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

अनेक प्रकल्पांवरील पाणी पुरवठा योजना प्रभावित :जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पात जलसाठा शिल्लक नसल्यामुळे अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात ५९ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचा प्रश्न तर गंभीर होईलच शिवाय पिके कोमेजत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ होऊ शकते तसेच दुबार पेरणीचेही संकट ओढावू शकते. त्यामुळे आता दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. 

जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा 
जिल्ह्यातमोठा प्रकल्प असलेल्या नळगंगामध्ये १४.०१ दलघमी साठा असून त्याची टक्केवारी २०.२१ आहे. तर पेन टाकळी प्रकल्पात ४.६५ दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ७.७५ आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या पलढग २१.९७ टक्के, ज्ञानगंगा २३.४९, मस १८.७५, कोराडी १३.४३, मन ९.५८, तोरणा ६.४६ तर उतावळी प्रकल्पात १७.८९ टक्के, तर ८१ लघु प्रकल्पामध्ये ११.६९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

२० लघु प्रकल्पांत मृत साठा शिल्लक 
जिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर २० प्रकल्पांमध्ये केवळ मृत साठा शिल्लक आहे. ढोरपगाव, व्याघ्रा, बोथा या प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे. तर तांदुळवाडी, निमगाव वायाळ, देवखेड दुसरबीड येथील कोल्हापुरी बंधारे देखील कोरडे पडले आहेत.