आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसाळ्यात बुलडाण्‍यातील 15 गावांमध्ये टंचाईच्या झळा, अत्यल्प पावसाचा फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - यंदा जिल्ह्यात अत्यल्प झालेला पाऊस, उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, परिणामी कोरडेठाक पडलेले लघु प्रकल्प, दिवसागणिक भूगर्भातील खोल जात असलेली पाणी पातळी, सिंचनासाठी होणारा पाण्याचा भरमसाठ वापर यासह इतर कारणामुळे जिल्ह्यांतील १५ गावे भर पावसाळ्याच्या दिवसात तहानलेली आहे. या तहानलेल्या गावांना पंधरा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्यास पाणीटंचाईग्रस्त गावामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेवून प्रशासनाने प्रकल्पातील जलसाठा आरक्षित करणे गरजेचे झाले आहे. 
 
मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धेअधिक प्रकल्प तहानलेले होते. परंतु नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात परतीच्या पावसाने दमदार सुरूवात करून दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पातील पाण्याचा सिंचनासाठी वापर केला होता. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात हे प्रकल्प अर्ध्यावर आले होते. दाहकत्या उन्हामुळे झालेले पाण्याचे बाष्पीभवन, सिचंनासाठी पाण्याचा भरमसाठ वापर याकारणामुळे जिल्ह्यातील ५५ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले तर अद्यापही तोरणा मन हे दोन मध्यम प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत. 
 
पावसाळा सुरू होवून तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्यापही जळगाव संग्रामपूर वगळता जिल्ह्यात पावसाने सुरूवात करून दिली नाही. पावसाअभावी जिल्ह्यातील एकाही नदि नाल्यांना पुर गेला नाही. त्यामुळे आजही जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम लघु प्रकल्पाची स्थिती चिंताजनक आहे. तीन महिन्यात जो काही पाऊस पडला तो फक्त पिकासाठीच पोषक ठरला आहे. सध्या स्थितीत प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना प्रभावीत झाल्या आहेत. त्यामुळे भर पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील १५ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावातील नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होवू नये, यासाठी या गावांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून प्रशासनाने विंधन विहिरी, नळ योजनेची विशेष दुरूस्ती, तात्पुरती पुरक नळयोजना, टँकरने पाणीपुरवठा खासगी विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. येत्या काही दिवसात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यास पाणीटंचाईग्रस्त गावामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 
 
४४ गावातील पाणीटंचाईतून झाली सुटका : जुन ते जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यातील ५९ गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. परंतु रिमझिम पावसामुळे भुगर्भात काही अंशी पाणीसाठा निर्माण झाला आहे. 
 
टंचाईग्रस्त झालेली गावे टँकर 
बुलडाणा तालुक्यातील गोंधनखेड पिंपरखेड या गावाला प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर चिखली तालुक्याती मेरा बुद्रूक एक टँकर, देऊळगावराजा तालुक्यातील पाडळी शिंदे, नागणगाव, धोत्रा नंदई प्रत्येकी एक टँकर, मेहकर तालुक्यतील दुर्गबाेरी, पारडी, बोथा, वरवंड घुटी या गावासाठी प्रत्येकी एक टँकर, सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी, सावरगाव माळ, सुजलगाव प्रत्येकी एक टँकर खामगाव तालुक्यातील जळका तेली या गावासाठी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. 
 
पाणीपुरवठा योजना प्रस्तावास मंजूरात 
मलकापूर तालुक्यातील तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विशेष दुरूस्तीच्या प्रस्तावासाठी १५६७.१३ लाख तर देऊळघाट येथील पाणी पुरवठा योजनेसाठी ९९.१४ लाख रुपये खर्चाच्या योजनेस मंजूरात मिळाली आहे. या योजनेच्या कामासाठी पन्नास टक्के म्हणजे ८३३.१३ लाख निधी प्राप्त झाला असून, हा निधी जिल्हा परिषदेला वितरीत करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...