आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ४०० जणांची शस्त्रे जिल्हा प्रशासनाच्या रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी म्हणून शहरातील सुमारे ४०० जणांची शस्त्रे लवकरच सरकारजमा होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील गृह विभागाने त्याबाबतची कारवाई सुरू केली असून मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच ही बाब अस्तित्वात येणार आहे. 
 
स्वसंरक्षण आणि बचावात्मक उपाय म्हणून काही नागरिक १२ बोअरची बंदूक, पिस्टल, रायफल इत्यादी शस्त्रे बाळगत असतात. मात्र अशी शस्त्रे वापरण्यासाठी त्यांना जिल्हा प्रशासनाकडून रितसर परवाना घ्यावा लागतो. या परवान्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडे शस्त्रधारी नागरिकांची अधिकृत माहिती जमा असते. या माहितीच्या आधारे शहरात अशा नागरिकांची संख्या सुमारे ४०० असून त्या सर्वांची शस्त्रे लवकरच सरकारजमा केली जाणार आहेत. 

मनपा निवडणुकीच्या काळात शहरभर जमावबंदी आदेश लागू असतो. त्यामुळे निवडणूक कालखंडात शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेला पार पाडावी लागते. ही जबाबदारी सुसह्य व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लायसन्सधारक नागरिकांकडून शस्त्रे जमा करवून घेतली जातात. दरम्यान आगामी निवडणूक काळातही फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला जाणार असून शस्त्र वापरावर बंदी घातली जाणार आहे. प्रत्यक्षात ही कारवाई त्या-त्या पोलिस ठाण्यालाच करावी लागते. त्यामुळे शहरातील दहाही ठाण्यांच्या हद्दीतील शस्त्रधारकांकडील शस्त्रे लवकरच जप्त केली जाणार आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करुन शस्त्रे जप्त केली जातात. 

एसपी प्रस्तावक, डीएम घेतात निर्णय 
निवडणूक काळात शस्त्र वापरावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्फत (एसपी) मांडला जातो. त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी याबाबतचे आदेश जारी करतात. पुढे या आदेशाची अंमलबजावणी त्यांच्याच नेतृत्वात काम करणाऱ्या आरडीसी कार्यालयामार्फत जारी झालेल्या पत्रांच्या आधारे ठाणेदारांमार्फत केली जाते. 

अलिकडेच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीदरम्यानही अशी कारवाई करण्यात आली होती. पाचही नगरपरिषद क्षेत्रातून २५ नागरिकांची शस्रे ताब्यात घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक दहा नागरिक मूर्तिजापूरचे रहिवासी होते. याशिवाय अकोटच्या नऊ, बाळापूरच्या चार आणि पातूर तेल्हाऱ्यातील प्रत्येकी एका नागरिकाचे शस्र जप्त करण्यात आले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...