आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर विकास आराखडा म्हणजे काय रे भाऊ..?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला शहर आराखडा तयार करण्याचा निर्णय महापौर उज्वला देशमुख यांनी घेतला आहे. परंतु शहर विकास आराखडा म्हणजे नेमके काय? याबाबत नगरसेवकांमध्ये समज-गैरसमज पसरले आहेत. कोणताही निधी मिळाला नसताना हा आराखडा कसा तयार होऊ शकतो? असा गैरसमजही अनेकांमध्ये असल्याने तुर्तास महापालिकेत शहर विकास आराखडा म्हणजे काय रे भाऊ? अशी एकमेकांना विचारणा होत असल्याचे अनुभवास येत आहे.

अमृत योजने अंतर्गत अकोला शहराचा समावेश आहे. या योजने अंतर्गत महापालिकेला विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळेच शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, या हेतूने अकोला शहर विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय महापौर उज्वला देशमुख यांनी घेतला आहे. या अनुषंगानेच तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या महासभेत या विषयावर चर्चा करुन निर्णय होणार आहे. महासभेत कोणत्याही विषयावर चर्चेसाठी टिपणी द्यावी लागते. अकोला शहर विकास आराखडा या विषयाची टिपणी कोणत्या विभागाने द्यावी? असा प्रश्न निर्माण झाला होता. बांधकाम विभाग, नगररचना विभागांनी ही जबाबदारी एकमेकांवर ढकलली. विकास आराखड्यात सर्व बाबींचा समावेश होतो, त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर नगररचना विभागाने टिपणी तयार करुन महासभेकडे पाठवली आहे. त्यात शहर विकास आराखड्याबात थोडक्यात माहिती देऊन उद्दीष्टही स्पष्ट केले आहे. तरीही अनेक नगरसेवकांना विकास आराखडा म्हणजे काय? हे समजू शकले नाही. त्यामुळेच अनेक नगरसेवक शहर विकास आराखडा म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न एकमेकांसह अधिकाऱ्यांना करत होते.
बातम्या आणखी आहेत...