आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भ : नेतृत्वाला सतर्क करणारा निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहूप्रतिक्षीत आणि बहूचर्चित नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीचा शेवटचा टप्पा निवडणूक निकालाच्या गदारोळासोबत थोडासा शांत होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नापासून ते मुख्यमंत्र्यांच्या प्रगतीपुस्काशी जोडल्या गेलेल्या या निवडणुकीत नेमके काय होणार याची मोठी उत्सुकता सर्वांनाच हाेती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी विदर्भाने भाजपच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. त्यामुळे भाजप या भागाकडे बालेकिल्ला म्हणून पाहतो तर इतर पक्षांनीही भाजपचे यश मान्य करत हातचे राखूनच प्रचार केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्यावर चालेल याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी थोडे आत्मविश्वासाने फिरत होते तर इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते विरोधाला विरोध करत होते. नगर पालिकांचा कारभार हा सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जगण्या- मरण्याशी संबंधित असतो. पिण्याचे, वापरण्याचे पाणी, रस्ते, वीज, पथदिवे, कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, घर, पाण्याला लागणारा कर, शहर वाहतूक अशा कळीच्या मुद्यांवरील या निवडणुकीच्या प्रचारातून नेमके हेच मुद्दे प्रचारातून गायब होते. चर्चा झालीच तर ती एक तर राष्ट्रीय विषयावर होत होती किंवा मग राज्यातील सरकारच्या कामगिरीवर. स्थानिक निवडणुकीत स्थानिक मुद्यांचा अभाव होता. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनासारख्या पक्षांनी तर निवडणूक एक औपचारिकता म्हणून लढताना स्थानिकांच्या भरवशावरच सगळं सोडलं होतं. अशा परिस्थितीत नेमका निकाल काय लागणार याची उत्सुकता होती. भाजपने विदर्भातील ३४ पैकी १७ नगरपालिका ताब्यात घेत बालेकिल्याला साजेल अशी कामगिरी दाखवून दिली. कॉंग्रेस व शिवसेनेने ५-५ नगरपालिका तर भारिपने तीन, अपक्षांनी २, राष्ट्रवादीने १ आणि नगरविकास आघाडीने १ नगरपालिका ताब्यात घेण्यात यश मिळवले. जागा वाढल्यातरी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला सतर्क करणारा हा निकाल आहे. लोकसभा, विधानसभेच्या वेळी मतदारांची जमा असलेली पुंजी कमी झाली, याचा बोध घेण्याचा हा प्रसंग आहे. शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्या तरी त्यांचे अस्तित्व कायम असल्याचे मतदारांनी दाखवून दिले. भारिपच्या जागा कमी झाल्या पण ३ ठिकाणी भारिप- बमसंने वर्चस्व सिद्ध केले आहे. जागरुक मतदारांनी भाजपला झुकते माप देत सतर्क केले आहे त्याच बरोबर सगळ्यांच पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही सतर्क करण्याचे काम केले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सचिन काटे, कार्यकारी संपादक (अकाेला)
बातम्या आणखी आहेत...