आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक परिवर्तन : पन्नास विधवांनीही केले वडाचे पूजन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा सौभाग्यवती महिलांचा सण. त्यांनी या दिवशी वडाचे पूजन करून जन्माेजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करावी अशी अापली परंपरा. पण या परंपरेत नवा पायंडा पाडून स्वामिनी विधवा विकास संस्थेने सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली. या संस्थेच्या पुढाकाराने रविवारी अकाेल्यातील जवळपास ५० विधवा व घटस्फोटित महिलांनी शहरात वडाचे पूजन केले.

स्वामिनी विधवा विकास संस्था ही अनेक वर्षांपासून विधवा व परित्यक्ता महिलांच्या हक्कासाठी लढा देत आहे. विधवा महिलांनादेखील इतर महिलांप्रमाणे जगण्याचा, सर्व सण-समारंभ साजरे करण्याचा अधिकार अाहे. याच विचाराने रविवारी रणपिसेनगरातील सिद्धिविनायक मंदिरात विधवा महिलांनी वडाचे पूजन करून वटपौर्णिमेचा सण साजरा केला.

एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाले तर त्यात तिचा काहीही दोष नसताे. मात्र, समाजात तिला एक प्रकारे ‘बहिष्कृत’च केल्याची वागणूक दिली जाते. तिच्यावर अनेक बंधने लादली जातात. एकविसाव्या शतकात अापण वावरत असताना या जुनाट परंपरा झुगारून देण्याचे धाडस स्वामिनी संस्थेने दाखवले अाहे.

मागील आठ वर्षांपासून स्वामिनी संस्थेतील विधवा, परित्यक्ता महिला वटपौर्णिमेचा सण साजरा करत असल्या तरी त्यात महिलांचा सहभाग अत्यल्प हाेता. यंदा मात्र २४ ते ८४ वर्षे वयोगटातील ५० महिलांनी एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा केला.
विधवा, घटस्फोटित महिला यादेखील समाजाचा एक भाग असून इतर नागरिकांप्रमाणे जगण्याचा त्यांनादेखील अधिकार आहे. सौभाग्यवती महिलांप्रमाणेच त्यादेखील सर्व सण, समारंभ साजरे करू शकतात, असे विचार या वेळी महिलांनी व्यक्त केले. स्वामिनी विधवा विकास मंडळाचे संचालक संजय कमल अशोक यांनी महिलांसोबत संवाद साधला. या उपक्रमात साधना पाटील, नंदा चोपडे, सुनीता टाले, सुनंदा ढवळे, नंदा अडनेरे, पुष्पा पोटे, सखुबाई दहातोंडे, मंगला आठवले, शोभा गंगासागर, रेश्मा गंगासागर, देवका काटोळे, कल्पना देशमुख, विद्या चव्हाण, छाया ठाकरे, लीलाबाई नाईक, नूतन चव्हाण, मनोरमा जुमळे, रेखा इंगळे, नर्मदा सोनोने, शकुंतला गावंडे, सरला राठी, आशाबाई गवई, फुलाबाई महल्ले अादींनी सहभाग घेतला.
बातम्या आणखी आहेत...