आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णा अभयारण्यात २१ पासून जंगल सफारी; निसर्गप्रेमींना उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरापासून जवळच असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात २१ एप्रिलपासून जंगल सफारी सुरु केली जाणार आहे. आतापर्यंत काटेपूर्णा अभयारण्यात फक्त नेचर ट्रेलच्या माध्यमातून फिरता येत पण आता जंगल सफारीची सोय वन्यप्रेमींसाठी उपलब्ध होत आहे. यासाठी मुख्य वनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांनी पुढाकार घेतला आहे. 

याबाबत माहिती देताना रेड्डी म्हणाले, काटेपूर्णा अभयारण्यात इको टुरीझमसाठी खुप मोठा वाव आहे. काटेपूर्णा प्रकल्पामुळे वर्षभर इको टुरीझम सुरु राहू शकतो यामधून अभयारण्यालगतच्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात अभयारण्यात जंगल सफारीसाठी रस्त्याची पानवठ्यांची निर्मीती करण्यात आली असून जवळपास २०० किलोमीटरचे नविन सफारीसाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. तसेच पर्यटकांना माहिती देण्याकरीता स्थानिक गावातील युवकांना गाईड प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

आजपर्यंत काटेपूर्णा अभयारण्यात राहण्याची व्यवस्था नव्हती. तिथे आता कॉटेजेसची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सफारी निवासाची बुकींग ऑनलाईन करण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. काटेपूर्णा अभयारण्यात आढळणारे बिबट, अस्वल, मसन्या उद, खवल्या मांजर, चितळ, चौसिंगा, चिंकारा, रान मांजर, तडस, कोल्हा, रानडुक्कर, रानकुत्रे आदी वन्यप्राणी यांच्या सोबतच १५० प्रकारचे विविध पक्षी अशी समृद्ध जैवविविधता जगासमोर येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी फेसबुक, ऑनलाईन, मार्केटिंग तसेच शेगाव, वाशीम, अमरावती अशा विविध ठिकाणी माहितीचे बोर्ड लावुन काटेपूर्णा अभयारण्याची माहिती पोचवली जाणार आहे. 

वन पर्यटनाला उत्तम सेवा सुविधा देण्यासाठी वाघा, फेट्रा, धोतरखेडा, रुई, देवदरी या गावातील ग्राम परिसर विकास समितीचे सहकार्य घेतले जाणार आहे. गावातील महिलांचे बचत गट तयार करुन त्यांना टिशर्ट मेकींग, बांबुपासून विविध वस्तु तयार करणे, हॉटेल मॅनेजमेन्ट आदी प्रशिक्षण देऊन त्यांना वन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार दिला जाणार आहे. 

काटेपूर्णातील वन पर्यटन वाढवण्यासाठी उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, सहाय्यक उपवनसंरक्षक गाढे, संतोष डांगे, वनरक्षक बिडकर, आर.आर.घुटके, जी.वाय.बर्डे, व्ही.जी.राऊत, मस्से, कुरवाळे, मोहरे, मंगेश इंगळे, मंगलदास येवले, अवी देशमुख आदी पुढाकार घेत आहेत. २१ एप्रिल पासुन सुरु होणाऱ्या या जंगल सफारीचा लाभ निसर्गप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन एम.एस.रेड्डी यांनी केले आहे. 

वन्यजिवांचे सहजरित्या दर्शन 
पहिल्याटप्प्यात कासमार गेट वरुन सफारी सुरु करण्यात येणार असून ही सफारी कासमार, चाका, लपणगृह, रिव्हर व्ह्यु, चिचबन फेट्रा, पांडव लेणी पॉईन्ट, रिव्हर पॉईन्ट, चौफुला करुन परत कासमास गेट अशी राहणार आहे. यामध्ये पाणवठ्यावर वन्यजिवांचे दर्शन सहजरित्या होऊ शकते. 
बातम्या आणखी आहेत...