आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तवाडी ले-आऊटमध्ये शॉक लागून मिस्त्रीचा जागीच मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान/ पिंजर - महान-पिंजरमार्गावरील दत्तवाडी ले-आऊटमध्ये सुरू असलेल्या बांधकामावर थ्री फेजच्या ताराला स्पर्श झाल्याने एका मिस्त्रीचा जागीच करुण अंत झाला. ही घटना १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. संबंधित बांधकामाची ग्रामपंचायतमध्ये नोंद नसून, ते बांधकाम अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.
दयाराम नंदापुरे, साल्पी यांनी महान येथील पिंजर मार्गावरील पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या दत्तवाडीमध्ये प्लॉट खरेदी करून त्या जागेवर घर बांधण्यास सुरुवात केली. घराचे बांधकाम अर्ध्याहून अधिक झाले आहे. १३ एप्रिल रोजी बिहाडमाथा येथील मिस्त्री बाळू उर्फ श्रीकृष्ण श्रीराम चौरीपगार, वय ४२ वर्षे हे दररोजप्रमाणे कामावर आले होते. आल्यानंतर घराचे बांधकाम सुरू केले. दरम्यान, घरावरून गेलेल्या थ्री फेजच्या वीज प्रवाहाला बाळू चौरीपगार यांच्या हातातील लोखंडी सळाखचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडल्याने महान परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे महान-पिंजर मार्ग जाम झाला होता. वीज प्रवाही तारांचा स्पर्श झाल्याने त्यांच्या तोंडाला जबर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. बाळू चौरीपगार यांच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही सर्व जबाबदारी बाळू चौरीपगार यांच्यावरच होती. मात्र, १३ एप्रिलच्या सकाळी झालेल्या दुर्घटनेमुळे चौरीपगार परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. संबंधित वीज तारांवरून बाजूला असलेले हेडाजी जिनिंग, पेट्रोलपंप, बालाजी जिनिंग या ठिकाणी थ्री फेजचा वीज प्रवाह सुरू असतो, हे विशेष. घटनास्थळी बार्शिटाकळी महावितरणचे अभियंता लाहोळे यांनी पाहणी केली. शासनाने योग्य ती चौकशी करून मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी या वेळी नागरिकांनी केली. महान पोलिस चौकीचे कर्मचारी बोरकर, काटकर, घोलम, माेरे यांनी घटनास्थळ गाठून मृतकाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास एस. पी. सोळंुके, पीएसआय डी. एन. फड सहकारी करत आहेत.

वडिलांचाही शॉक लागल्याने मृत्यू : मृतकबाळू चौरीपगार यांचे वडील श्रीराम चौरीपगार यांचासुद्धा काही वर्षांपूर्वी पिंजर रस्त्यावरच एका शेतामध्ये महालक्ष्मीच्या दिवशी वीज प्रवाहाचा स्पर्श होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.