आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी ट्रक्सवर उमटणार पिवळे पट्टे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींचे जीपीएस (ग्लोबल पोझीशनिंग सिस्टीम) ट्रॅकींग करण्याच्या निर्णयापाठोपाठ आता या ट्रकांवर पिवळे पट्टे उमटविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे संबंधित वाहन हे गौण खनीजाची वाहतूक करणारा ट्रक असल्याचे सर्वसामान्यांना सहजच कळणार आहे. 


असा प्रयोग करणारा अकोला हा राज्यातील पहिलाच जिल्हा असून त्यामुळे खनिजाच्या चोरट्या व्यवहाराला आळा बसणार आहे. जिल्हा खनिकर्म विभागाच्या ताज्या निर्णयानुसार ट्रकच्या दोन्ही बाजूंवर पिवळा पट्टा उमटवला जाणार असून त्यावर काळ्या शाईने ‘खनिज पुरवठा करणारे वाहन’ असे ठळक अक्षरात लिहले जाणार आहे. तीन फूट लांब आणि दीड ते दोन फूट रुंद अशा पट्ट्यांमुळे हे वाहन दूरवर असतानाच नागरिकांच्या दृष्टीपथात येणार आहे. 
जिल्ह्यात मुरुम दगडाच्या ३६ खाणी आहेत. यातून वेळोवेळी गौण खनीज बाहेर काढले जाते. त्यानंतर गरजेनुसार सुमारे ५०० मालमोटारींद्वारे या खनिजाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक पारदर्शक व्हावी, यासाठी नव्या पद्धतीचा लाभ होणार आहे. खनीज वाहतूक करणाऱ्या सर्व मालमोटारींवर पाळत ठेवणे प्रशासनाला शक्य नाही. 


त्यामुळे त्यावर उमटवलेल्या पट्ट्याची मोठी मदत होणार आहे. हा पट्टा सतत सर्वसामान्यांच्या दृष्टीस पडणार असून काही चुकीचे होत असल्यास तेही तक्रार करु शकणार आहेत. एका अर्थाने वाहतूक करणाऱ्यांवर आता सामान्य नागरिकांचाही वचक राहणार आहे. 


जीपीएस ट्रॅकींगचाही निर्णय 
गौण खनिजाची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी जीपीएस ट्रॅकींगचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. या ट्रकींगचे संचालन जिल्हा खनिकर्म कार्यालयातून केले जाईल. त्यामुळे एखाद्या खाणीतून किती दगड किंवा किती ब्रास मुरुमाचा उपसा झाला आणि कोणत्या मालमोटारीद्वारे ते खनीज कोठे वाहून नेले, याचे जीवंत रेकॉर्ड संबंधित कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. 


चोरट्या व्यवहाराला आळा बसेल 
खनिजांची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींचे जीपीएस ट्रॅकींग आणि वाहनांवर पिवळे पट्टे उमटविण्यात येणार असल्याने चोरट्या व्यवहाराला आळा बसेल. ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सुरुवातीपासूनच विशेष काळजी घेतली आहे. 
- डॉ.अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला. 

बातम्या आणखी आहेत...