आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘...तुम्ही आमच्या अंडर काम करता’,विभाग प्रमुखांची बैठक घेण्यावरुन झाली प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेत पदाधिकाऱ्यांना विभाग प्रमुखांची बैठक घेण्याचा अधिकार आहे का? त्यात महापौर विभाग प्रमुखांची बैठक घेऊ शकतात का? यावरुन प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये महापौरांच्या ऍन्टी चेंबर मध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या खडाजंगीत महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला मी तुमच्या अंडर काम करीत नाही तुम्ही आमच्या अंडर काम करता, हे लक्षात घ्या, असे खडे बोल सुनावले. महापालिकेत या खडाजंगीची चर्चा चवीने सुरु होती. प्रशासन आणि पदाधिकारी ही महापालिकेची दोन चाके आहे. महापालिकेचे कामकाज चालण्यासाठी अधिनियमही तयार करण्यात आले आहे. 
 
महासभेने म्हणजेच पदाधिकारी, नगरसेवक यांनी प्रस्ताव मंजुर करायचा आणि त्या मंजुर प्रस्तावाची अमंलबजावणी प्रशासनाने करायची जर प्रस्ताव महापालिकेचे नुकसान करणारा असेल तर तो केवळ राज्य शासनाकडे विखंडीत करण्यासाठी पाठवायचा,अशी जबाबदारी दिलेली आहे. प्रशासन हे सरकारी नोकर तर पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींना स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिक महत्व आहे. महापालिका अस्तित्वात आल्यापासून प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात अनेकदा खटके उडाले.
 
 यात कधी पदाधिकाऱ्यांची चुक होती तर कधी प्रशासनाची चुक होती. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे कोण? असा जेव्हा प्रश्न येतो. त्यावेळी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. मात्र ज्यावेळी प्रशासन आपणच मोठे, सर्व अधिकार आपल्यालाच, अशी समज करुन घेतो, त्यावेळी एकतर्फी वाद सुरु होतात.
 
महापालिकेत गेल्या काही दिवसापासून असा प्रकार सुरु आहे. स्थायी समितीने मंजुर केलेल्या प्रस्तावाची उलट अमंलबजावणी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे प्रशासन पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुसफुस सुरु होती. दरम्यान महापालिका निवडणुकीमुळे ही धुसफुस थांबली होती.
 
मात्र आता नविन कार्यकारीणी नऊ मार्चला अस्तित्वात आल्यापासूनच या धुसफुशीला प्रारंभ झाला आहे. पदग्रहण समारंभासाठी महापालिका कार्यालयात मंडप टाकण्यावरुनच प्रशासनाने नाराजी व्यक्त करीत नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना नाराज केले होते. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा विभाग प्रमुखांची बैठक घेण्यावरुन प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद काही अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे मिटला. परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे का? अशी चर्चाही या निमित्ताने सुरु आहे.
 
महापौर विजय अग्रवाल यांनी सलग तीन दिवस सुटी असल्याने दहा मार्चला दुपारी तीन वाजता विभाग प्रमुखांची बैठक बोलावली. या अनुषंगाने पीबीएक्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सर्व विभाग प्रमुखांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत माहिती दिली. ही बाब प्रशासनाला कळताच, प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला कोणाला विचारुन तसेच कोणाच्या परवानगीने विभाग प्रमुखांना बैठकीचे निरोप दिले, असा प्रश्न करुन निलंबित करण्याचा इशारा दिला.
 
या प्रकारामुळे संबंधित कर्मचारी घाबरला. ही बाब महापौर विजय अग्रवाल यांना कळताच त्यांनी प्रशासनाला याबाबत जाब विचारला. त्यानंतर अधिकारी आणि महापौर यांची महापौरांच्या ऍन्टी चेंबर मध्ये तब्बल तास-दीड तास बैठक झाली. या बैठकीत पदाधिकारी आणि प्रशासनात चांगलीच खडाजंगी झाली. 
 
महापालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब 
प्रशासन,पदाधिकाऱ्यांत वाद झाल्याने मनपात शेकडो कर्मचाऱ्यांचे कान या बैठकीकडे लागले होते. नेमके या बैठकीत काय झाले? याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता लागली होती. यात महापौर विजय अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना मी तुमच्या अंडर काम करीत नाही, तुम्ही माझ्या अंडर काम करता, ही बाब लक्षात घ्या तसेच विभाग प्रमुखांची बैठक घेण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, हे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? याचा जाब विचारला. काही अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्या नंतर विभाग प्रमुखांची बैठक घेण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु ही वादळा पूर्वीची शांतता आहे का? अशी चर्चाही या निमित्ताने सुरु होती. 
बातम्या आणखी आहेत...