आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Consumed Poision Before State Minister For Home Office

गृह राज्यमंत्र्यांच्या अाॅफिसात युवकाने प्राशन केले विष, डाॅक्टरांवर कारवाईसाठी टाेकाचे पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गृह राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात एका युवकाने शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. युवकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात अाले असून त्याची प्रकृती स्थिर अाहे. संताेष भगत असे विष घेणाऱ्या युवकाचे नाव अाहे. दरम्यान, या वेळी पाटील मात्र कार्यालयात नव्हते.
संतोष भगत यांच्या सासऱ्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना ३ एप्रिल रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर तातडीने उपचार न झाल्यामुळे भगत आणि त्यांच्या पत्नीने डॉक्टरांना जाब विचारला. त्यावरून डॉक्टर आणि भगत यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तेथील शंभरपेक्षा जास्त असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी भगतसह त्यांच्या गरोदर पत्नीच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी १२५ डॉक्टरांविरुद्ध आणि भगत यांच्यासह नातेवाइकांवर परस्पर गुन्हे दाखल केले होते.
भगतसह त्यांच्या नातेवाइकांना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, डॉक्टरांना अटक झाली नाही. त्यानंतर भगत यांच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. त्याचीही तक्रार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यावर कारवाई न झाल्यामुळे संतोष भगत यांनी २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास त्यांनी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार संतोष भगत हे शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी विष प्राशन केले.

सोफ्यावर बसून घेतले विष
भगत हे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजता पोहोचले. त्यांनी ऑपरेटरला ‘साहेब आहेत काय?’ म्हणून विचारले, त्यावर त्याने ‘साहेब उद्या येणार अाहेत,’ असे सांगितले. त्यानंतर भगत रिसेप्शनसमाेरील असलेल्या सोफ्यावर जाऊन बसले. त्यांनी खिशातील विषाची बाटली काढून ते प्राशन केले. त्यातील काही विष त्यांच्या अंगावरही सांडले होते. त्यानंतर त्यांना लगेच ऑटोमध्ये नेऊन सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढे वाचा... मंत्र्यांनी दिले एसपींना पत्र