आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपलं जठारपेठ’ उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांना मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तंत्रज्ञानाच्यायुगात जग जवळ आले असे म्हटले जात असले, तरी जवळची व्यक्ती अनेक कारणांमुळे दूर गेल्याचे पाहायला मिळते. शिक्षण, नोकरीनिमित्ताने मेट्रो सिटीत किंवा दुसऱ्या देशात स्थायिक होणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ मंडळींची संख्या अधिक असलेली दिसून येते. एकीकडे अपार्टमेंट संस्कृती वाढत असताना या एकट्या ज्येष्ठ मंडळींना सहकार्य करण्यासाठी युवकांनी एकत्र येऊन ‘आपलं जठारपेठ’ हा उपक्रम सुरू केला आहे.
आपलं जठारपेठ या उपक्रमांतर्गत जठारपेठ, तापडियानगर, बिर्ला कॉलनी या परिसरातील ज्येष्ठ मंडळींसाठी २४ तास नि:शुल्क कार सेवा देण्यात येत आहे. पुणे, मुंबई किंवा परदेशी नोकरी करण्याकडे युवकांचा कल अधिक आहे. मुलं जरी दुसऱ्या शहरात गेले असले, तरी त्यांचे आई-वडील त्याच शहरात एकटे राहत आहेत. त्यामुळे या सुशिक्षित, मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. रात्री-बेरात्री दवाखाना, मेडिकलमध्ये जाणे किंवा बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक, खासगी लक्झरी स्टँड येथे जाण्यासाठी या ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. शिवाय अनेक वेळा ऑटोरिक्षादेखील मिळत नाही. त्यामुळे या ज्येष्ठ व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो.
एक शेजारी म्हणून आपल्या शेजाऱ्याला सहकार्य करण्याचे आपल्याला शाळेत, घरी शिकवलेले असते. या आजी-आजोबांचे मुलं जरी त्यांच्याजवळ राहत नसले, तरी एक मुलगा म्हणून आपण त्यांच्यासाठी कार्य केले पाहिजे, हाच उद्देश ठेवून ‘आपलं जठारपेठ’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

आपलं जठारपेठ हा उपक्रम आदित्य दामले, सौरभ भगत, सचिन गव्हाळे, श्रीकांत आमले, अमर बेलखेडे, राजेश पिंजरकर यांनी सुरू केला. २६ मार्च २०१६ रोजी शिवजयंतीच्या पर्वावर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमात जठारपेठ, तापडियानगर, बिर्ला कॉलनी या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांना २४ तास नि:शुल्क कार सेवा देण्यात येत आहे. यासोबत ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालय किंवा इतर कार्यालयांत अडचणी आल्यास त्यादेखील सोडवण्यासाठी सहकार्य करण्यात येते. थोडक्यात या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘आपलं जठारपेठ’ या उपक्रमांतर्गत सहकार्याचा हात मिळत आहे.
सहकार्याची भावना
^जठारपेठ परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींची संख्या जास्त आहे. अशावेळी त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी असते. या उपक्रमामुळे ज्येष्ठांना सहकार्य करण्याची भावना अनेक लोकांमध्ये निर्माण झाली आणि ते त्यांच्या परीने सहकार्य करत आहेत. - आदित्य दामले

हे आहेत संपर्क क्रमांक
ज्या ज्येष्ठ व्यक्ती, महिलांना कार सेवा पाहिजे असेल त्यांनी या क्रमांकावर फोन करावा. ८४४६१५६३६०, ८९८३८८३४९४, ९८२२३०३६५३, ९०४९५९०३००, ९०२८१९३५५१, ९८२२८०११९४ या क्रमांकांपैकी एका भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन केल्यास नि:शुल्क कार सेवा मिळवता येईल.