आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zilha Parishad Teachers To Be Without Salary In Festivels Season

जिल्हा परिषदेचे शिक्षक उत्सवकाळातही वेतनाविना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - सण-उत्सव साजरे करण्याच्या दिवसांतही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना महिना होत आला असतानाही वेतन मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या घरी सण-उत्सवांवर पाणी फेरल्या गेले आहे. एक तारखेलाच शिक्षकांचे वेतन करण्याचे शिक्षणमंत्री यांनी दिलेले आश्वासन मात्र, आता फोल ठरत आहेत. शिक्षक दिन असणाऱ्या सप्टेंबर महिन्यातच ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांची संख्या जिल्ह्यात दोन हजार ३९४ एवढी आहे. या शाळांवर कार्यरत असणारे सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक, सहाय्यक पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आदींचे वेतन गणेशोत्सव, गौरी उत्सव बकरी ईदला तरी व्हावे, अशी शिक्षकांची अपेक्षा होती. परंतु, शिक्षकांनी वेतनाची प्रतीक्षा करूनही वेतन मिळाले नाही. शनिवार, २६ सप्टेंबर आणि रविवार, २७ सप्टेंबरला सुटी आहे. पुढील तीन दिवसांत वेतन होण्याची शक्यता धूसर आहे. परिणामी आगामी काळात येणाऱ्या दुर्गोत्सवासह इतर सण साजरे कसे करावेत, घरात लागणारे साहित्याची जुळवाजुळव कशी करावी, कर्जफेड कशी करावी, असे विविध प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाले आहेत. वेतन होण्याचे निश्चित कारणही त्यांना सांगितल्या जात नाही. नेहमीप्रमाणेच कर्मचारी कमतरतेचे कारण दाखवल्या जात आहे. त्यामुळे वेतन एक तारखेला वेळेवर होत नसल्यास आंदोलन करण्याची तयारी शिक्षक संघटनांकडून सुरू आहे.

शिक्षक दिनाचीही नाही केली कदर : शिक्षकदिनाचे पुरस्कार देऊन शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. आदर्श शिक्षक म्हणून शिक्षकांना गौरवल्या जाते. सर्वत्र शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सन्मान देण्यात येतो. मात्र, शासनाने ठरवल्याप्रमाणे वेळेवर वेतन झाले का कोणीही दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे. शासन प्रशासनाने दर महिन्याच्या एक तारखेला तसेच सणाच्या दिवसांत योग्य वेळी वेतन देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कर्जाचे धनादेश बँकेत येतात
काही शिक्षकांना इतरही आधार असल्याने महिनाभर वेतन नाही झाले तरी काही वाटणार नाही. परंतु, ज्यांचा संसारच वेतनावर चालतो. त्यांना कर्ज काढावे लागते. अशा प्रसंगी हप्ता भरल्यास धनादेश बँकेत लावण्यात येतात. अशा शिक्षकांनी काय करावे, असा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने त्वरित वेतन द्यायला हवे.
-सुभाष देवकर, तालुकाध्यक्ष,शिक्षक संघटना, बुलडाणा

आश्वासनाप्रमाणे वागणे अपेक्षित आहे.
शैक्षणिक कार्याचा मान सन्मान ठेवून शिक्षक प्रामाणिकपणे शिकवण्याचे काम करतो. काम करताना शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ज्ञानदानाचे कार्य करतांना संसाराचा रथही ओढावा लागतो. यासाठी पैसे म्हणजेच वेतन आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दरमहा एक तारखेलाच वेतन देणे अपेक्षित आहे. राजू काकडे, जिल्हाध्यक्ष,शिक्षक संघटना

बुलडाणा तालुक्यात ५०० शिक्षक
बुलडाणापंचायत समिती अंतर्गत मराठी उर्दू माध्यमांच्या ९६ शाळा असून, ५२ मुख्याध्यापक, ३९ पदवीधर शिक्षक ३९७ सहाय्यक अध्यापक अशी मंजूर पदे आहेत.

प्रणालीची अडचण
शालार्थवेतन प्रणाली या ऑनलाईन पध्दतीने वेतन होते. परंतु, शासन ऑनलाईन कंपनी यामधील करारात समन्वय नसल्याने वेतन होत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये होत आहे.

ज्युनिअर कॉलेजच्या वेतनावर २३ कोटी
बुलडाणाजिल्ह्यात ४३५ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यामधील तसेच माध्यमिक शाळेवरील शिक्षकांना दरमहा २३ कोटी रुपये वेतन दिल्या जाते.