अकोला - अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपास अखेर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाली. परंतु, ज्या बियाण्यांचा पेरा जिल्ह्यात सर्वाधिक कमी आहे, असे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाणार आहे. बीटी बीजी- क्रांती हे ते बियाणे असून, यास विरोधकांनी विरोध दर्शवता निमूटपणे मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवार, १७ जून रोजी अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, समाजकल्याण समिती सभापती गोदावरी जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती द्रौपदाबाई वाहोकार, सदस्य विजयकुमार लव्हाळे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, पुंडलिक अरबट, दामोदर जगताप, गजानन उंबरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेचे सचिव एस. एम. कुळकर्णी यांनी विषयसूची वाचून दाखवली. यानंतर २५ मे रोजी पार पडलेल्या स्थायी समिती सभेचे इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. यानंतर जिल्हा कृषी िवकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी मोफत बियाणे वाटपाच्या योजनेची माहिती दिली. यावर सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, गजानन उंबरकर, पुंडलिकराव अरबट, डॉ. हिंमतराव घाटोळ यांनी आक्षेप घेत ज्या बियाण्यांचे नाव माहीत नाही, असे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा काय उद्देश असल्याचा आरोप केला. उंबरकर यांनी वेळेवर बियाणे वाटपाचा खटाटोप कशासाठी, असा सवाल उपस्थित केला. डॉ. हिंमतराव घाटोळ यांनी मोफत बियाणे वाटपापेक्षा शेतकऱ्यांना त्यांना चॉइसप्रमाणे बियाणे खरेदी करू द्या, अन् त्याचे बिल जिल्हा परिषदेने पेड करावे, असा सल्ला दिला. चंद्रशेखर पांडे गुरुजींनी सुद्धा नेहमीप्रमाणे विरोधाची भूमिका ठेवता शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय म्हणून माघार घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला. प्रत्यक्षात याद्या पाहण्यासाठी सुद्धा वेळ सदस्यांकडे नसावा, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
नेहमीप्रमाणे अधिकारी अनुपस्थित : याबैठकीला नेहमीप्रमाणे गटविकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह अनेक अधिकारी अनुपस्थित होते. याबाबत भारिपचे गटनेते तथा सदस्य विजयकुमार लव्हाळे यांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार नेहमीचाच असल्याचे सांगत सीईओंना याप्रकरणी लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. यावर सीईओ अरुण विधळे यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षांचीसिस्टिमवरील पकड सुटली : अधिकाऱ्यांचेबैठकीला अनुपस्थित असणे, कोणत्याही पत्राला रिस्पॉन्स देणे यासारखे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. यास अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी केला. अध्यक्षांची सिस्टिमवर पकड असली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सर्वशाळांना मिळणार शिक्षक : बिंदूनामावली सादर करण्यासाठी दीड महिन्याचा अवधी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. शिक्षकाचे समायोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, असा विश्वास सीईओ अरुण विधळे यांनी सभेत व्यक्त दिला.
लवकरच होणार बियाण्यांचे वाटप
लाभार्थी याद्या तयार असून, लवकरच आम्ही बियाण्यांचे वाटप करू, असा दावा अध्यक्ष शरद गवई यांनी केला. अजूनही शेतकरी अर्ज करू शकतात, असे आवाहन केले.
हे तर शेतकरी आत्महत्येचे षड््यंत्र
^बियाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी घ्यायला हवी होती. मंजूर केलेल्या बियाण्यांचा पेरा कमी असून, त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. बियाणे उगवले नाही तर नुकसानभरपाई जिल्हा परिषद देईल काय?'' नितीन देशमुख, सदस्य,जिल्हा परिषद