अमरावती; अमरावती जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीत मागील तीन दिवसांपासून ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध तसेच गावठी दारू गाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली होती. या वेळी पोलिसांनी १०६ ठिकाणांवर धाड टाकून ११४ जणांना अटक केली होती तसेच त्यांच्याकडून लाख ५९ हजार ४८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोळा आगामी काळात येणारे उत्सव लक्षात घेता ग्रामीण पोलिस अधीक्षक लख्मी गौतम यांनी जिल्हाभरात अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेच्या आधारे जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी १० ते १२ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबवली होती. पुढील काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे ग्रामीण पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावठी दारू गाळण्याचे काम सुरू होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली आहे.
मध्य प्रदेशच्या सीमेवर दारू अड्डा उद्ध्वस्त
पोलिसांचीही मोहीम सुरू असतानाच शेंदुरजना घाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या करवार या गावाबाहेर गावठी दारूचा अड्डा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी करवारला अड्ड्यावर धाड टाकून ११ हजारांचा ऐवज जप्त केला. या ठिकाणावरून दारूचा पुरवठा मध्य प्रदेश अमरावती जिल्ह्यात होत असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश चतरकर, एएसआय अरुण मेटे, एएसआय मूलचंद भांबुरकर, त्र्यंबक मनोहरे, गजेंद्र ठाकरे, सचिन मिश्रा यांनी केली आहे.