आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे शाखेत १४ नवे शिलेदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकासह दहा कर्मचाऱ्यांची मागील आठवड्यात बदली झाल्याने या रिक्त जागी नवीन दहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एपीआय गोपाल उपाध्याय यांच्यासह न्यायालयीन पैरवी अधिकारी एपीआय परतेकी यांचीसुद्धा बदली करण्यात आली असून, चार नवीन अधिकारी ठाण्यांमधून घेण्यात आले आहेत. हे फेरबदल पोलिस आयुक्तांनी मंगळवारी (दि. ५) केले आहेत.

गुन्हे शाखेमध्ये माेठ्या प्रमाणात अंतर्गत कलह असून, त्याचा परिणाम थेट कामावर होत आहे. त्यामुळे डिटेक्शनचे प्रमाण घसरले आहे. असा ठपका ठेवून पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांची बदली केली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक आत्राम यांच्या जागेवर मागील आठवड्यात कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांची बदली झाली. दरम्यान, मंगळवारी गुन्हे शाखेचे एपीआय गोपाल उपाध्याय यांची बदली गाडगेनगर पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच पैरवी अधिकारी सुमीत परतेकी यांची शहर कोतवाली ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच गाडगेनगरचे एपीआय फिरोज खान पठाण, कोतवालीचे एपीआय दत्ता देसाई, नांदगावपेठचे पीएसआय प्रवीण पाटील, खोलापुरी गेटचे पीएसआय प्रवीण वेरुळकर या चार अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेत बदली देण्यात आली आहे. या चार अधिकाऱ्यांच्या बदलीसोबतच दहा नवीन कर्मचाऱ्यांना ठाण्यांमधून गुन्हे शाखेत घेण्यात आले आहे. त्यामध्ये कर्मचारी हे शहर कोतवाली, गाडगेनगर आणि एक खोलापुरी गेट ठाण्यामधून आले आहे.

काही कारणांमुळे गुन्हे शाखा सातत्याने चर्चेत होती. दरम्यान, शहरात गुन्हे वाढतच आहे. मात्र, शहर पोलिसांना ते गुन्हे रोखण्यात किंवा चोरट्यांना पकडण्यात यश येत नाही. दरम्यान, आता पोलिस निरीक्षकपासून ते दोन एपीआय, दोन पीएसआय आणि दहा कर्मचारी अशा पद्धतीने १०० टक्के अधिकारी आणि २५ टक्के कर्मचारी नव्याने गुन्हे शाखेत आले आहे. या बदलांमुळे कामात सुधारणा होईल, अशी अपेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे.