आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत 4 नवजात बालकांचा मृत्यू; हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा सांगत नातेवाईकांनी केली मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शवविच्छेदनासाठी डॉक्टरांच्या पथकाची वाट पाहून भावना आवरू न शकणारे पालक... - Divya Marathi
शवविच्छेदनासाठी डॉक्टरांच्या पथकाची वाट पाहून भावना आवरू न शकणारे पालक...
अमरावती - सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांचा विषय ऐरणीवर असतानाच अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील (पीडीएमसी) डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ नवजात बालकांचा रविवारी रात्री एकाच वेळी मृत्यू झाला. या चिमुरड्यांना किरकोळ कारणांसाठी पीडीएमसीच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांची बेपर्वाई त्यांच्या जिवावर बेतल्याने संतप्त नातेवाइकांनी रोष व्यक्त केला.
 
पूजा आशिष घरडे यांची चार दिवसांची कन्या, माधुरी बंठी कावरे यांचा दोन दिवसांचा मुलगा, शिल्पा दिनेश विरुळकर यांचा दोन दिवसांचा मुलगा व अाफरीन बानो अब्दुल राजीक यांच्या चार दिवसांच्या बाळाचा या मृतांमध्ये समावेश आहे. या चौघांवरही मागील तीन ते पाच दिवसांपासून पीडीएमसीमधील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये असलेल्या एनआयसीयूमध्ये (नवजात शिशू अति दक्षता विभाग) उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री १.०० वाजता अाफरीन बानो अब्दुल राजीक यांचे बाळ दगावले. या मृत्यूची आरडाओरड होऊ न देता प्रशासनाने मृतदेह मध्यरात्रीच नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर अर्ध्या तासात उर्वरित तिन्ही बालके दगावल्याचे समजल्यानंतर माता व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. विशेष म्हणजे कावरे व विरुळकर यांच्या अर्भकांना नातेवाइकांनी रात्री साडेदहा वाजता  आयसीयूमध्ये ठेवण्यासाठी परिचारिकांकडे सोपवले होते. त्या वेळी त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व परिचारिकांनीच तसे नातेवाइकांना सांगितले होते. त्यानंतर दगावलेल्या अर्भकांना पाहण्याची परवानगीही नाकारण्यात आली. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ अर्भके दगावल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. मनसेचे शहराध्यक्ष संतोष बद्रे व अन्य पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जाब विचारला. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरच्या श्रीमुखात मारल्याने तणाव निर्माण झाला.
 
घर पाहण्यापूर्वीच सोडले जग : किरकोळ कारणांमुळे बाळांना एनआयसीयूमध्ये ठेवले हाेते. एनआयसीयूमध्ये २-४ दिवस ठेवायचे आणि घरी घेऊन जायचे, असे नातेवाइकांना वाटले. मात्र चिमुकल्यांना रविवारी मध्यरात्रीच स्वत:ची हक्काची घरेही पाहता आली नाहीत, असा आरोप करून बालकांच्या नातेवाइकांनी आक्रोश केला होता.
 
डॉक्टर फोनवरच दंग...
बाळावर उपचाराऐवजी संबंधित डॉक्टर फोनवर बोलण्यातच दंग होते. त्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली असावी, असा आरोप करत पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांनी महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सोमेश्वर निर्मळ यांच्याकडे प्रकरणाची चौकशी सोपविली. त्यांनी २४ तासांनंतर चौकशी अहवाल मिळेल, असे सांगितले.
 
दूध मागताच म्हणाले...दवाखान्यात म्हशी नाहीत!
संतप्त झालेले बाळांचे नातेवाईक अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांच्याकडे येऊन सांगत होते. एका बाळाला दूध पाहिजे होते, त्यामुळे नातेवाइकाने विचारले, दूध कुठे मिळेल? त्या वेळी रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने नातेवाइकाला म्हटले, आमच्या दवाखान्यात म्हशी नाहीत, की तुम्हाला दूध मिळेल. यावरून पीडीएमसीमधील कर्मचारी व डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांसोबत किती ‘सभ्य’तेने संभाषण करतात, हे लक्षात येते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यु झाल्यानंतर डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयात मातांचा आक्रोश पाहा फोटोज आणि व्हिडिओमधून..
बातम्या आणखी आहेत...