आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: चुकीच्या इंजेक्शनमुळे दगावली 4 नवजात बालके, डॉ. कट्टाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पीडीएमसीमध्ये रविवारी मध्यरात्री ‘एनआयसीयू’ उपचार घेत असलेल्या चार नवजात बालकांचा मृत्यू चुकीचे इंजेक्शन दिल्याने झाल्याचे पीडीएमसीच्या वैद्यकिय अधिक्षकांच्या चौकशी अहवालात उघड झाले. या प्रकरणी डॉ. भुषण कट्टा व परिचारीका विद्या थोरात यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. कट्टा यांना मंगळवारी (दि. ३०) अटक करण्यात आली आहे. या भीषण घटनेमुळे पीडीएमसीतील आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहे.
 
दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सकांनी चौकशी अहवालाच्या आधारे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून डाॅ. भुषण कट्टाला मंगळवारी (दि. ३०) दुपारी अटक केली आहे.
 
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात (पीडीएमसी) रविवारी मध्यरात्री एकाचवेळी चार नवजात बालकांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात मंगळवारी तीन बालकांच्या मृत्यूप्रकरणात पीडीएमसीच्या वैद्यकिय अधीक्षकांकडे तसेच जिल्हा शल्य चिकीत्सकांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशी अहवालावरून बालकांना चुकीचे इंजेक्शन दिल्याचे तसेच एनआयसीयूमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात न आल्याचे कारण पुढे आले अाहे. पीडीएमसीच्या एनआयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या व दोन तासांपुर्वी सुदृढ असलेल्या चार नवजात बालकांचा आकस्मिकपणे मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान तीन बालकांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या अध्यक्षेतेखाली चौकशी समिती नेमली होती तर पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. जाणे यांनी महाविद्यालय स्तरावर पीडीएमसीच्या वैद्यकिय अधिक्षकांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली होती. या दोन्ही समितीने सोमवारी सकाळपासून चौकशीला प्रारंभ केला होता. या दोन्ही समितीने मंगळवारी सकाळपर्यंत चौकशी पुर्ण करून अहवाल तयार केला. या अहवालात बालकांचा मृत्यू चुकीचे इंजेक्शन दिल्याने झाला असल्याचे पुढे आले. प्रामुख्याने ‘किसोल’ घटक असलेले संबंधित इंजेक्शन हृदयविकार असलेल्या रुग्णांना देण्यात येते. परंतु संबंधित बालकांना गरज नसताना ‘किसोल’ घटकाचे इंजेक्शन देण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
 दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अरुण राऊत यांना दिले होते. डॉ. राऊत यांच्या समितीमध्ये दोन बालरोगतज्ज्ञ तसेच दोन पॅथालॉजिस्ट अशा पाच तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांची चौकशी पुर्ण झाली असून पीडीएमसीच्या एनआयसीयूमध्ये बालक दगावली, त्या ठिकाणी या समितीने पाहणी केली असता एनआयसीयूमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. यावरून संबंधित डॉक्टरांचा हलगर्जीपणा यातून दिसून येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अरूण राऊत यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून एनआयसीयूला ‘इन्चार्ज’ असलेले डाॅ. भुषण कट्टा व संबंधित परिचारिका विद्या थोरात यांच्याविरुध्द सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. कट्टाला मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली आहे. 
दरम्यान याच प्रकरणात मंगळवारी सांयकाळी संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन डॉ. शिंगारे यांनी त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी स्थापण केली आहे. या समितीमध्ये अकोला येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेश आहे.
 
ह्दयरुग्णांसाठी होतो ‘किसोल’ घटकाच्या औषधांचा वापर 
‘किसोल’या घटकाचा वापर शक्यतोवर ह्दयरोगी रुग्णांवर उपचारांसाठी डॉक्टरांकडून करण्यात येतो. तो वापर सुध्दा अंत्यत अटीतटीच्या वेळी केला जात असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांनीच सांगितले आहे. ‘किसोल’ या घटकांमधून रुग्णाला ‘पोटॅशिअम’ मिळते. बाळांनासुध्दा याच इंजेक्शनच्या घटकाचे इजेक्शंन देण्यात आले असावे, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे  वैद्यकिय अधिक्षकांनी केलेल्या चौकशी समितीच्या अहवालावरून पुढे आला आहे.  असे पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. जाणे यांनी ‘दै. दिव्य मराठी’सोबत सांगितले आहे. दरम्यान हे इंजेक्शन घटनेच्या दिवशी रात्री एनआयसीयूमध्ये बाळांना देण्यात आल्याचे, अहवालात पुढे आल्यामुळे पीडीएमसीकडून हा अहवाल गाडगेनगर पोलिसांना देण्यात आला. या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आल्यामुळेच पोलिसांनी त्याच गुन्ह्यात घटनेच्या वेळी कार्यरत पीडीएमसीच्या परिचारीका विद्या थोरात यांनाही सहभागी केले आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, एनआयसीयूमध्ये आढळले ‘स्टॅफिलोकॅकस ओरिअस’...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...