आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी होणार आता ६०० घरांची नवीन वसाहत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती शहरात सध्या पोलिसांसाठी असलेले शासकीय निवासस्थान हे किमान ५० वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. त्यामुळे अनेक निवासस्थान राहण्यासाठी योग्य नाहीत. मात्र, पर्याय नसल्यामुळे पोलिस कर्मचारी त्याच ठिकाणी वास्तव्य करत आहेत. त्यामुळेच पोलिसांसाठी ६०० घरांची शासकीय वसाहत तयार करण्याचा निर्णय पोलिस विभागाने घेतला आहे. यासाठी नुकतीच पोलिस आयुक्त पोलिस अधीक्षकांची बैठक झाली. या ६०० घरांपैकी ४०० शहर पोलिसांना तर २०० ग्रामीण पोलिसांना देण्यात येतील. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिसांच्या आशियाना येथील वसाहत वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी पोलिसांसाठी असलेले शासकीय निवासस्थान अतिशय जीर्ण झाले आहेत. सद्य:स्थितीत शहर ग्रामीण पोलिसांसाठी मुख्यालयात १५०, मिल्ट्री कॅम्प ११२ शासकीय निवासस्थान आहेत. तसेच कोतवाली ठाण्याच्या परिसरात २७, राजापेठ ठाण्याच्या परिसरात ५७ तसेच बडनेरा येथील विश्रामगृहासमोर ४९ शासकीय निवाससथान आहेत. एकूण ५७७ शासकीय निवासस्थान आहेत. त्यापैकी सध्या १३७ निवासस्थान हे राहण्यायोग्य नसल्यामुळे ते रिकामे पडलेले आहे. उर्वरित ४१० निवासस्थानांमध्ये पोलिसांचे वास्तव्य आहे. मात्र, या सर्वच निवासस्थानांचे किमान ५० वर्षांपूर्वी बांधकाम झालेले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात या वसाहतीत राहणाऱ्या पोलिस कुटुंबीयांना हलाखीने दिवस काढावे लागतात. यापूर्वी अनेकदा या जीर्ण घरांबाबत पोलिसांनी वरिष्ठाकंडे मागणी केली. मात्र, तोडगा निघाला नाही. पोलिस आयुक्त व्हटकर रुजू झाल्यावर त्यांनी पोलिसांच्या जीर्ण वसाहतीबाबत गंभीरतेने निर्णय घेऊन पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा केली. तसेच पोलिस उपायुक्तांना आदेश देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सर्वेक्षण करण्यास सांगितले. त्यानुसार उपायुक्त गावराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जीर्ण झालेल्या सर्वच वसाहतींची पाहणी केली आहे. पाहणीअंती सर्वच ठिकाणी नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यालय वगळता उर्वरित ठिकाणी बांधकाम करून प्रत्येक ठिकाणी फ्लॅट सिस्टिम काढण्यात येणार आहे. या बांधकामाचे आर्थिक बजेट हे कोटी रुपयांच्या वर जाणारे आहेत. त्यामुळे हे काम पोलिस विभागाच्या हाऊसिंग विभागाकडून करावे लागणार आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयात ६०० नव्या घरांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर जाऊन कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे.
सर्व्हेपूर्ण, प्रस्ताव तयार : नव्यानेइमारत बांधण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सर्व्हे पूर्ण केलेला आहे.

कोतवाली भागात अधिकारी निवासस्थान
पोलिसांसाठी६०० घरांचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सध्या कोतवालीमध्ये २७ घरे असून, यामध्ये तीन अधिकाऱ्यांचे घर आहेत. नवीन प्रस्तावांमध्ये कोतवाली परिसरात एक इमारत तयार करून या ठिकाणी २५ घर हे अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात येतील. याच वेळी सध्या मुख्यालय परिसरात असलेल्या १५० घरांच्या ठिकाणी नव्याने एकही घर होणार नाही.

बडनेऱ्यातील ४९ पैकी ४५ घरे नाहीत राहण्यायोग्य
बडनेरायेथील विश्रामगृहासमोर असलेले ४९ घर हे जवळपास ८७ वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या ४५ घर हे राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे या ठिकाणी कोणीही राहत नाही. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही अनेक घरांची विदारक स्थिती झालेली आहे. मात्र, दुसरा पर्याय नसल्यामुळे पोलिस कर्मचारी आपापल्या सोयीप्रमाणे पावसाळ्यात घरांवर ताडपत्री टाकून पाण्यापासून सरंक्षण करून दिवस काढत असल्याचे चित्र पावसाळ्यात पाहायला मिळते.

पहिल्या टप्प्यात ६०० निवासस्थाने
कर्मचारी अधिकाऱ्यांना योग्य स्थितीत निवासस्थान असायला पाहिजे, त्यासाठीच आम्ही सर्व्हे करून नव्याने घर बांधण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. सध्या हा प्रस्ताव प्राथमिकस्तरावर आहे. ६०० पैकी २०० घर ग्रामीण पेालिसांसाठी तर ४०० शहर पोलिसांसाठी राहणार आहे. हा पहिला टप्पा आहे. राजकुमार व्हटकर, पोलिस आयुक्त. अमरावती.
बातम्या आणखी आहेत...