आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६५ वर्षीय महिलेला सुवर्णपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- विविधखेळांमध्ये प्रावीण्य दाखवणारे खेळाडू हे साधारणत: तरुण असतात. मात्र, यवतमाळ येथे राहणाऱ्या आणि पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय महिलेने गेल्या काही वर्षांत प्रौढांच्या विविध स्पर्धा गाजवून राष्ट्रीय स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक प्राप्त करण्याचा विक्रम केला आहे. वेणूताई मोतीराम मोहतुरे, असे त्या ६५ वर्षीय महिलेचे नाव आहे. त्यांच्यात असलेली जिद्द आणि खेळाडूवृत्ती आजही तरुणांना लाजवेल, अशीच आहे.
वेणूताई यांनी नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या वयस्कांच्या नॅशनल अॅथलॅटिक स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर लगेच राजस्थान येथील अलवर शहरात असलेल्या आर. आर. कॉलेजमध्ये पार पडलेल्या सहाव्या सुवराणी अॅथलॅटिक स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत त्यांनी २०० मीटर, ४०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यासोबतच किलोमीटर धावण्याच्या शर्यतीतही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांनी यापूर्वीही देशाच्या कानाकोपऱ्यात पार पडलेल्या विविध वयस्कांच्या अॅथलॅटिक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून त्या स्पर्धा गाजवल्या आहे. वेणूताई या पोलिस दलात १९८३ मध्ये दाखल झाल्या होत्या. त्यादरम्यानही त्यांनी विविध खेळांमध्ये पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करून विजय संपादन केला होता. पोलिस दलात सेवा समाप्त करून त्या २००७ मध्ये जमादार पदावर असताना सेवानिवृत्त झाल्या. हाही काळ परिवारात दिल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेली खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी त्यांनी पुन्हा सुरुवात केली. त्यातच त्यांनी वयस्क अॅथलॅटिक स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले. आजही वेणूताईंना मैदानावर धावताना पाहून तरुण खेळाडू तोंडात बोटे घालतात. त्यासोबतच वेणूताईंच्या परिवारातील पती माेतीराम, पोलिस दलात असलेला मुलगा संजय, सून आणि नातवंडेही त्यांच्या या कामगिरीचा अभिमान असल्याचे सांगतात. त्यामुळे भविष्यात त्यांची इच्छा असेपर्यंत त्यांना खेळू देणार असल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

लुगडे घालून मैदानी चाचणी
वेणूताईयांनी १९८३ साली पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया दिली होती. त्या वेळी पार पडलेली मैदानी चाचणी देण्यासाठी आजप्रमाणे टी-शर्ट किंवा लोअर उपलब्ध नव्हते. त्यामुळे चक्क लुगडे घालूनच त्यांनी पोलिस दलाची मैदानी चाचणी दिली. त्यात उत्तम गुण प्राप्त केल्याने त्यांची पहिल्याच प्रयत्नात निवडही करण्यात आली.

अंगात रग असेपर्यंत खेळणार
आयुष्यातया खेळामुळे बरेच काही साध्य झाले आहे. सेवानिवृत्तीनंतर खेळायचा निर्णय घेतला. त्यासाठी घरातील सदस्यांचेही पाठबळ मिळाल्यानेच हे यश प्राप्त झाले. त्यामुळे अंगात रग आणि जोर असेपर्यंत खेळत राहणार आहे. त्यासाठी आपली संपूर्ण तयारीही आहे. वेणूताईमोहतुरे, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी.