आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यातबंदीमुळे अडले देशी अश्वांच्या व्यवसायाचे ‘घाेडे’; बंदी उठववण्‍याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारंगखेडा यात्रेत घाेड्याची पाहणी करताना मुख्यमंत्री. - Divya Marathi
सारंगखेडा यात्रेत घाेड्याची पाहणी करताना मुख्यमंत्री.

सारंगखेडा- नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशी घोड्यांच्या व्यापाराला उत्तेजन देण्याचा प्रयत्न एकीकडे राज्य सरकार करत असतानाच, देशी घोड्यांच्या निर्यातीवर केंद्राने बंदी लादली आहे. किमान अाता तरी केंद्र सरकारने निर्यातबंदीचा पुनर्विचार करण्याची गरज या सारंगखेडा फेस्टिव्हलदरम्यान अनेक घोडे व्यापारी आणि स्टडफार्म्सच्या मालकांनी व्यक्त केली. ही निर्यातीवरील बंदी उठल्यास घोड्यांची पैदास करण्याचा उद्योग भरभराटीस येऊ शकेल, असा विश्वास सारंगखेडा फेस्टिव्हलदरम्यान अनेक घोडे व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.  


देशी घोड्यांमध्ये मारवाडी, काठियावाडी य पांढऱ्याशुभ्र नोखरा जातींना प्रचंड मागणी असते. मात्र, या जातींच्या पैदाशीसाठी विशेष प्रयत्न करण्याऐवजी केंद्र सरकार या घोड्यांच्या निर्यातीवर बंदी घालून पळवाट काढू पाहत आहे.  दरम्यान, ‘आज फक्त  काही धनदांडग्यांच्या हौसेपुरता मर्यादित असलेला  हा उद्योग देशी घोड्यांच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास फेस्टिव्हलचे अायाेजक व राज्याचे पर्यटन मंत्री  जयपाल रावल यांनी व्यक्त केला.  देशी घोड्यांच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. अमळनेर येथील घोडे व्यावसायिक प्रशांत पाटील म्हणाले, ‘सधन शेतकरी, व्यावसायिक स्टड फार्म्सचे मालक, घोडे व्यापारी किंवा संस्थानिक अशा व्यक्तीच घोड्यांची पैदास करण्यात अग्रेसर आहेत. मात्र निर्यातीवरील बंदी उठवल्यास सर्वसामान्य शेतकरीसुद्धा या व्यवसायात उतरून आपली आर्थिक उन्नती साधू शकतील.’

 

देशी घोड्यांच्या निर्यातीवर बंदी का?

स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वच प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी होती. १९९९ मध्ये ही बंदी उठली, मात्र देशी घोड्यांना निर्यातीसाठी प्रतिबंध घटकांच्या यादीत टाकले. परिणामी देशी घोड्याच्या निर्यातीसाठी केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून ना हरकत घेणे बंधनकारक झाले. तरीही २००० मध्ये फक्त सहा मारवाडी घोड्यांची अमेरिकेला व काठियावाडी घोड्यांची श्रीलंकेत निर्यात झाली. मात्र पुढे या दोन्ही देशी जातींना धोकादायक प्रजातींत समाविष्ट करुन २००७ पासून केंद्रानेे ‘ना हरकत’ देणे बंद केले.  निर्णयावर टीका झाल्याने मग सरकारने प्रदर्शन व खेळासाठी घोड्यांना विदेशात पाठवण्याची परवानगी दिली. मात्र त्यासाठी प्रति घोडा १० लाख डिपाॅझिटची व बारा महिन्यांच्या आत घोडा पुन्हा देशात अाणण्याची अट ठेवली.

 

घाेडे बाजाराला तीनशे वर्षांची परंपरा

 

सारंगखेडा फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत २५०० पेक्षा अधिक घोड्यांची नोंदणी झाली आहे. ३ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या फेस्टिव्हलद्वारे सारंगखेडा हे ठिकाण उदयोन्मुख पर्यटन ठिकाण हवे यासाठी  प्रयत्न केले जात आहेत. उत्तर महाराष्ट्रात तापीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये ३०० वर्षांपासून हा घोडेबाजार सुरू अाहे. त्याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत केला जात आहे. गुजरातमधील रण महोत्सव, राजस्थानातील पुष्कर येथील कॅटल फेअरच्या धरतीवर सारंगखेडा महोत्सव जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

 

२००७ प्राणी जनगणनेनुसार

> ४.७४ लाख इतके देशी घोडे देशात असून त्यापैकी मारवाडी जातीच्या घोड्यांची संख्या २४ हजार इतकी आहे. 

> १० वर्षांनंतर मारवाडी घोडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असा दावा सरकार करत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सारंगखेड चेतक महोत्सवाची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ: मुख्यमंत्री  

 

बातम्या आणखी आहेत...