आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- पशुपक्ष्यांसह मनुष्यासाठी घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजावर न्यायालयाने बंदी घातली आहे. असे असले तरी स्वत:च्या आर्थिक हितासाठी शहरातील काही व्यापाऱ्यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवला होता. हा मांजा आग्रा येथून आणल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री शहरातील तीन व्यापाऱ्यांकडे धाड टाकून तब्बल १ लाख ३६ हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. विशेष म्हणजे पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून नायलॉन मांजा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पोलिसांनी मोहन श्यामलाल मतलानी (४५), प्रकाश रेलूमल खत्री (४५, दोघेही रा. रामपुरी कॅम्प) आणि मर्तज अली हकिउद्दीन (४८, रा. जैन मंदिराजवळ, सराफा बाजार अमरावती) या तीन व्यापाऱ्यांच्या गोदाम व दुकानात धाड टाकून १ लाख ३६ हजार ६७० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. मोहन मतलानीचे रामपुरी कॅम्पस्थित गोदामात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा साठवल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पीएसआय राम गिते व त्यांच्या पथकाने मतलानीच्या गोदामावर छापा टाकून १ लाख २८४८० रुपयांचा मांजा जप्त केला. यामध्ये मांजाचे मोठे १५५ डबे, लहान आकाराचे डबे १६६ यासह विविध प्रकारच्या कंपन्यांचा नायलॉन मांजाचा समावेश आहे.मतलानी शहरातील किरकोळ मांजा विक्रेत्यांना मांजाचा पुरवठा करत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे यापूर्वीच पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. दरम्यान बुधवारी सराफा बाजारातील मर्तज अली हकिउद्दीन याच्या फॅन्सी खिलौना व फटाका दुकानातून मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली असता २६७० रुपयांचा मांजा आढळला. तसेच रामपुरी कॅम्प परिसरातील प्रकाश खत्री यांच्या टॅक्सी सायकलच्या दुकानातही मांजा असल्याच्या माहितीवरून धाड टाकली असता ५५२० रुपयांचा मांजा मिळाला. या दोघांनाही पोलिसांनी विचारले असता त्यांनी मतलानीकडून मांजा घेतल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्धही पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम ५(२, १५) अन्वये कारवाई करत नोटीस देऊन सोडले, मात्र चौकशीसाठी गुरुवारी बोलावले होते.
शहरातील तीन व्यापाऱ्यांकडे पोलिसांची धाड
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ज्या व्यापाऱ्यांकडून मांजा जप्त केला, त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. हा मांजा कुठून आणला, हे विचारले, तर कधी आग्रा सांगतात तर कधी कुठून आला ते नेमके माहीत नाही. मांजा खरेदीचे बिलही नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करत आहे. मांजा पकडू नये म्हणून व्यापारी 'धागा' हा कोडवर्ड वापरत असल्याचे तपासात पुढे आले.
पर्यावरण नियंत्रण महामंडळास माहिती
गुप्त माहितीच्या आधारे आम्ही तीन मांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. मांजा कुठून आणला याबाबत त्यांनी अद्याप ठोस माहिती दिली नाही, मात्र आम्ही त्यांच्याकडून ही माहिती घेत आहोत. या कारवाईबाबत पर्यावरण नियंत्रण महामंडळाला माहिती दिली. ते अधिकारीसुद्धा आले असून कारवाई करत आहेत.'' प्रमेश आत्राम, पीआय, गुन्हे शाखा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.