आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी कठोरावासीयांचा मोर्चा, प्रशासन अजूनही निद्रिस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अमरावती- कठोरा नाका परिसरातील रंगोली लाॅन मागील संत गाडगेबाबा मंदिराला लागून असलेले देशी दारूचे दुकान बंद करा, अशी मागणी परिसरातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना केली आहे. बडनेरा येथील दारूचे दुकान हटवण्यासाठी झालेल्या मागणीनंतर लगेच कठोरा रोडवरील महिलाही दारूबंदीसाठी सरसावल्या ही सकारात्मक बाब असल्याचे मत श्री संत गाडगेबाबा संस्थेचे विश्वस्त कठोरा रोड यांनी व्यक्त केले आहे. 

सर्वसामान्यांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आयुष्य वेचणारे संत गाडगेबाबा यांच्या मंदिरालाच लागून दारूचे दुकान असणे ही खरेच प्रशासनाची उदासीनताच म्हणावी लागेल.

 

या देशी दारूच्या दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येऊ नये, ही मागणी जुनीच आहे. या दुकानामुळे परिसरातील महिला, युवती व मुलींना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आजवर अनेकदा देण्यात आल्या. मात्र बडनेरा जुनी वस्ती येथील दारूच्या दुकानाला इतरत्र हलवण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्यानंतर अचानक कठोरा नाका परिसरातील महिलांमध्येही आशा निर्माण झाली आहे. त्यांनी आज आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले, की संत गाडगेबाबा यांच्या मंदिराला लागून असलेले दारूचे दुकान बंद करा किंवा ते इतरत्र स्थलांतरित करा, अशी मागणी संस्थेचे विश्वस्त आणि नागरिकांनी गेल्या काही वर्षांपासून पत्राद्वारे केली आहे. ज्यावेळी देशी दारूचे दुकान या परिसरात सुरू झाले त्यावेळी हा परिसर रिकामा होता. आता येथे दाट लोकवस्ती झाली असून दुकानाभोवतीघरेही झालेली आहे. तसेच त्याला लागून २१ वर्षांपासून संत गाडगेबाबा मंदिरही आहे. त्यामुळे परवान्याचे नूतनीकरण करताना दर पाच वर्षांनी परिसराची पाहणी करून तेथील नागरिकांना होत असलेला त्रास आणि दुकान बंद करण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत काय, याची चौकशी व्हायला हवी होती. मात्र असे न करता उत्पादन शुल्क कार्यालयात बसूनच शहानिशा केली जाते व शासनाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून परवान्याचेही सातत्याने नूतनीकरण केले जात आहे.


या दुकानासाठी असलेले ठिकाण योग्य नाही. तेथे वाहनतळ व ग्राहकांना बसण्यास जागाही नाही. शासनाचे परिपत्रक तसेच शासनाच्या आदेशानुसार परिसरातील नागरिकांना होणारा त्रास आणि सर्वसामान्यांच्या तक्रारी यांचा विचार करून या दारू दुकानाच्या परवान्याचे पुढच्या वर्षी नूतनीकरण करण्यात येऊ नये. ते स्थलांतरित किंवा बंद करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील महिला व नागरिकांनी निवेदनात केली आहे. याप्रसंगी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्यासह ज्योत्स्ना शेळके, किरण गुप्ता, कोकिळा वसू, लता लेवटकर, मीनाक्षी बोंडे, ज्योती मुंदाले, गौरी पाटील, जया काकडे, नलिनी लंगडे, र.स. क्षीरसागर, सुषमा वडुरकर, सिंधू सरदार, अनिता जानोरकर, निवेदिता उंबरकर, सिंधू देवबाले, जयश्री देबवाले, भावना गवळी, लता उमळ, शरद सरदार, सतीश क्षीरसागर, दीपक बदुरकर, उमेश जानोरकर, अशोक देवबाले, दीपक उंबरकर, सुनील अलमक, एस. एस. बोंडे, रवींद्र गवळी व इतर उपस्थित होते. 

 

उत्पादन शुल्क व दुकान मालकाची हात मिळवणीचा आरोप 

राज्य उत्पादन शुल्क व दारू दुकान मालकाचे एकमेकांशी हातमिळवणी करत आजवर नागरिकांच्या तक्रारींची दखलच घेतली नाही. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून मिळालेल्या पत्रानुसार त्यांनी बयान नोंदवून घेतल्याचे सांगितले जाते. एवढे सांगून उत्पादन शुल्क कार्यालय नागरिकांची बोळवण करत असते. त्यामुळेच परिसरातील नागरिकांची भावना लक्षात घेऊन हे दुकान बंद करावे. तसेच परवान्याचे नूतनीकरणही करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...