आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- मानसिक व शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या कबड्डी खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, रुख्मिणी नगरातील नेताजी सामाजिक विकास संस्थेच्या मैदानात शुक्रवार, १९ जानेवारीपासून महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा जोश क्रीडा प्रेमींमध्ये संचारणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून खेळाडूंमध्येही कमालीचा उत्साह दिसून येत आहे.
देशात लोकप्रिय असलेल्या कबड्डीची काही वर्षांपूर्वी पिछेहाट झाली होती. परंतु सध्या कबड्डीला अच्छे दिन आल्याचे दिसत असून, खेळाडूंमध्ये कबड्डीबाबत दिवसेंदिवस आस्था निर्माण होत आहे. देशी खेळ असलेल्या या खेळाला चालना मिळावी यासाठी रुख्मिणी नगर येथील नेताजी सामाजिक विकास संस्थेने पुढाकार घेतला अाहे. संस्थेच्या वतीने उद्यापासून अखिल भारतीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद््घाटन सायंकाळी ६ वाजता गृहराज्यमंत्री डॉ. रणजित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुनील देशमुख राहतील. या स्पर्धेत २२ पुरुषांचे, तर १० महिलांचे संघ मैदानात उतरणार आहेत. पुरुष गटातील पहिल्या विजेत्या संघाला स्व. बाबूराव वानखडे, आमलेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ७१ हजार, तर उपविजेत्या संघाला स्व. श्रीकिशनराव रंगनाथराव देशमुख, अंबाजोगाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ३१ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. महिला गटात विजेत्या संघाला जिजाऊ अर्बन को. ऑप. बँकेच्या वतीने ४१ हजार रुपये रोख, उपविजेत्या संघाला ३१ हजार, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या शिवाय मॅन ऑफ द टुर्नामेंटला १५ हजार रुपये रोख व वुमन ऑफ द टुर्नामेंटला ११ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.