आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकून भरदिवसा तरुणाचा केला खून; मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- वारंवार होत असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून पैशाची मागणी करणाऱ्या तरुणाचा मिरची पावडर डोळ्यात फेकून धारदार शस्त्राने निर्दयतेने खून करण्यात आला. ही घटना येथील आरटीओ कार्यालयासमोरील मार्गावर गुरुवार १८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर अवघ्या काही तासात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन मारेकऱ्यांना अटक केली. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रितेश ऊर्फ बल्ली विलास बाविस्कर वय ३० वर्ष रा. पाटीपूरा असे मृतकाचे तर नईम ऊर्फ टमाटर खान वल्द गुलाब नबी खान वय ३२ वर्ष रा. अलकबिर नगर आणि बंटी लाला ऊर्फ नंदलाल जयाप्रसाद जयस्वाल वय ३० वर्ष रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी अशी या प्रकरणातील दोन आरोपींची नावे आहेत. 


या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत बल्ली याने नंदलाल जयस्वाल याला पैसे दिले होते. दरम्यान बल्ली हा जयस्वाल याला वारंवार पैशांची मागणी करीत होता. अशातच उधारी पैकी काही पैसे देण्यासाठी गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास नईम खान आणि बंटीलाला जयस्वाल या दोघांनी बल्ली याला आरटीओ कार्यालयाजवळ बोलावून घेतले. यावेळी पैशाच्या देवाण-घेवाणातून दोघात वाद निर्माण झाला. या वादात रागाच्या भरात नईम आणि बंटीलाला जयस्वाल या दोघांनी धारदार सत्तूर काढून बल्लीवर हल्ला केला. यावेळी रितेश ऊर्फ बल्ली याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान या दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याला वाटेत पकडले. यावेळी दोघांनीही रितेश ऊर्फ बल्ली याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार सत्तूरने त्याच्यावर सपासप वार केले. यात रितेश ऊर्फ बल्ली याला एक हाताचा पंजा तुटून वेगळा पडला. त्याशिवाय तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळून त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. 


या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बाविस्कर, विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गिते, शहर डीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मृत बल्ली याची आई फुलाबाई विलास बाविस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. 


बल्लीच्या शिरावर खुनाचा गुन्हा 
मृतक रितेश उर्फ बल्ली बाविस्कर याने सन २०१३ साली अजय बनसोड या तरूणाचा खून केला होता. यावेळी न्यायालयाने बल्ली याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु बल्लू बाविस्कर याने उच्च न्यायालयातून जामीन मिळवला. 


दोन तासात आरोपी अटक

रितेश ऊर्फ बल्ली बाविस्कर याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिस विभागातील पथकाला आरोपी इंदिरा नगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी नईम खान आणि बंटीलाला याला अटक केली आहे. 

 

आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी 
रितेश उर्फ बल्ली बाविस्कर याच्या खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या दोन तासाच्या आत विशेष पथकाने अटक केली. त्यानंतर लगेच दुपारी दोन्ही आरोपींना शहर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दि. २३ जानेवारीपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात मिलन कोयल करीत आहे. 


हाणामारीत मारेकरीही झाले जखमी 
रितेश ऊर्फ बल्ली बाविस्कर याच्यावर मारेकरी नईम उर्फ टमाटर आणि बंटीलाला उर्फ नंदलाल जयस्वाल यानी मिरची पावडर टाकूण धारदार शस्त्राने वार केले. यावेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी रितेश उर्फ बल्ली यानेसुद्धा या दोघांना मारहाण केली. यात नईम उर्फ टमाटर आणि बंटीलाला उर्फ नंदलाल जयस्वाल या दोघांच्या हाताला मार लागला असून दोघेही जखमी झाले आहे. 


मारेकऱ्यांवर परिसरातील नागरिकांनी केली दगडफेक 
शहरातील आरटीओ कार्यालयासमोरील मार्गावर रितेश ऊर्फ बल्ली बाविस्कर या तरूणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून नईम ऊर्फ टमाटर खान वल्द गुलाबनबी खान आणि बंटीलाला ऊर्फ नंदलाल जयाप्रसाद जयस्वाल या दोघांनी धारदार सत्तूरने सपासप वार केले. ही घटना घडत असताना घटनास्थळ परिसरात असलेल्या काही नागरिकांनी मारेकऱ्यांवर दगडफेक केली. त्यामुळे त्या मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...