आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ पर्वणी; 31 जानेवारीला ‘ब्ल्यू मून’चा शीतल चंद्रप्रकाश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - खगोलप्रेमीसांठी अलीकडच्या काळात अवकाशात सध्या तारका, उल्कांची पर्वणी सुरू असतानाच ३१ जानेवारीला दुर्मिळ ‘ब्ल्यू मून’चे मनोहारी दृश्य पाहायला मिळणार आहे. एका शतकात साधारणत: तीन ते पाच वेळा दिसणारा निळा चंद्र या वर्षी प्रथमच दोन वेळा दिसणार असल्याने खगोलप्रेमी व अभ्यासकांसाठी पर्वणी राहणार आहे. 


कॅलेंडरच्या एकाच महिन्यात दोन पौर्णिमा ज्यावेळी येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला खगोल शास्त्रात ‘ब्ल्यू मून’ म्हणण्याची पद्धत आहे. या महिन्यातील पहिली पौर्णिमा २ जानेवारीला होती. साधारणत: दोन पौर्णिमांमध्ये २९.५ दिवसांचे अंतर असते. त्यामुळे जेव्हा पहिली पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीला येते तेव्हा दुसरी पौर्णिमा त्याच महिन्याच्या शेवटी येते. अशा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हणण्याची पद्धत आहे. फेब्रुवारी हा महिना २८ दिवसांचा असल्याने या महिन्यात कधीच दोन पौर्णिमा येत नाही. हा महिना वगळता कोणत्याही महिन्यात दोन पौर्णिमा येऊ शकतात. ‘ब्ल्यू मून’ची सर्वात जुनी नोंद १५२८ मध्ये करण्यात आली. कधीकधी एकाच वर्षात दोन वेळा ब्ल्यू मूनचे दर्शन घडते. या वर्षात ३१ मार्चला पुन्हा ब्ल्यू मून दिसणार आहे. एकाच वर्षात दोन वेळा ब्ल्यू मून दिसण्याचे चक्र १९ वर्षाचे असते. हा चंद्र इतर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणेच असतो. यात कोणत्याही प्रकारचे वेगळेपण नसते. त्यामुळे ३१ जानेवारीला पौर्णिमेच्या चंद्रात  निळेपणा दिसेलच असे नसल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.   
   
   
या तारखांना दिसणार ब्ल्यू मून
चालू शतकात २१ जानेवारी व ३१ मार्च २०१८ रोजी ब्ल्यू मूनचे दर्शन होणार आहे. त्यानंतर १९ मे २०१९ व ३१ ऑक्टोबर २०२० मध्ये ब्ल्यू मूनचे दर्शन होईल.


का दिसतो ब्ल्यू मून?
अवकाशात ०.७ मायक्रॉनपेक्षा किंचित जाडीचे धूलिकण निर्माण होतात. या कणांमुळे लाल रंगाची निर्मिती झाल्यानंतर ब्ल्यू मूनचे दर्शन घडते. ब्ल्यू मून शतकातून साधारणत: तीन ते पाच वेळा दिसत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यानंतर एकाच वर्षात दोन ब्ल्यू मून दिसण्याची घटना २०३७ मध्ये घडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...