आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगात पोते, गळ्यात बोंडअळीग्रस्त कपाशीच्या बोंडाचे हार अन् हातात घेतले बेशरमाचे झाड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषीत केलेली मदत सरकारने तत्काळ व सरकसट द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार, दि. १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात विधानसभा निहाय चक्री धरणे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी अंगात पोते, गळ्यात बोंडअळीग्रस्त कपाशी बोंडाचे हार आणि हातात बेशरमाचे झाड घेवून अभिनव आंदोलनाला सुरवात केली. त्याचबरोबर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्या आला. 


यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना, राष्ट्रीय युवा संघटना, शेतकरी वारकरी संघटना, बेंबळा कालवे संघर्ष समिती आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांनी बोंडअळीग्रस्त बोंडाचे हार गळ्यात घालून सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी पोती पांघरून सरकार विरोधात घोषणा दिल्या. बोंडअळीमुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेतल्यामुळे मुख्यमंत्री यवतमाळचा दौरा टाळल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा जाहीर निषेध नोंदविला. विद्यमान मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सर्व सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी काहीही देणे घेणे नाही, असे यावरून दिसून येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामूळे सर्व शेतकरी बांधवांनी एकजुट होवून शासनाने बोंडअळीसाठी जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार रूपयांची मदत पदरात पाडून घेण्यासाठी सातही दिवस धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून सायंकाळी धरणे मंडपात आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी अशोक बोबडे, प्रवीण देशमुख, अनिल हमदापुरे, अरुण राऊत, अरविंद वाढोनकर, सुधीर जवादे, माधुरी अराठे, राजू तेलंगे, बाबु पाटील वानखडे, दिनेश गोगरकर, गाडे पाटील, युसुफअली सैयद, बबन गोखरे, बालू पाटील दरणे, प्रा. घनश्याम दरणे, अशोकराव केवटे, बंडू कापसे, बल्लू जगताप, अशोक घरफळकर, प्रवीण कोकाटे, विलास भोयर, जयंत काळे, मिलिंद इंगोले, बाबाराव निमरड, सिकंदर शहा, आनंद जगताप, पंजाबराव भिसे, शशिकांत देशमुख, कृष्णाभाऊ भोयर, सुवर्णा ठाकरे, स्वाती दरणे, तिलोत्तम मडावी, चंदू चांदोरे, अरुण लांडगे, नरेंद्र कोंब, नितीन पराते, विवेक ठाकरे, अतुल राऊत, मुकेश देशमुख, जयंत घोंगे, प्रकाश छाजेड, गजानन नाईकवाड, जानराव गिरी, प्रदीप ठुणे, या सह राळेगाव मतदार संघातील शेतकऱ्यांसह काँग्रेस, मनसे, शेतकरी संघटना, कळंब विकास आघाडी, बेंबळा कालवे संघर्ष समिती, शेतकरी वारकरी संघटना, शेतकरी संघर्ष समिती आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

बोंडअळीच्या प्रश्नावर पथनाट्य 
एकता कला मंचच्या शेतकरी, युवक-युवतींच्यावतीने बोंडअळीच्या प्रश्नावर प्रभावी पथनाट्यसुद्धा सादर करण्यात आले. या पथनाट्याचे लेखक, दिग्दर्शक व संगीत संयोजक नितीन कोल्हे, शिवराज कावडकर, मुकेश लोहकरे, प्रकाश ठेंगणे यांनी केले. तर राधा मोरे, दुर्गा थोरात, कोमल गोरडे, चेतन नंदरधने, आदींनी यात भूमिका निभावल्या. 


जिल्ह्यामध्ये २५ जानेवारीपर्यंत चालणार चक्री धरणे आंदोलन 
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषीत केलेली मदत सरकारने सरकसट द्यावी, या मागणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय आज, दि. १९ जानेवारीपासून चक्री धरणे आंदोलनाला सुऊवात करण्यात आली. शुक्रवारी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शनिवार, दि. २० रोजी आर्णी विधानसभा क्षेत्र, दि. २१ रोजी पुसद विधानसभा क्षेत्र, दि. २२ रोजी दिग्रस विधानसभा क्षेत्र, दि. २३ रोजी उमरखेड विधानसभा क्षेत्र, दि. २४ रोजी वणी विधानसभा क्षेत्र, आणि दि. २५ रोजी यवतमाळ विधानसभा क्षेत्रनिहाय सर्व पक्ष, संघटना, शेतकरी बांधवाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चक्री धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...