आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनगावसुर्जी कृउबासवर "परिवर्तन'ची सत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी परिर्वतन पॅनलचे संजय रोहणकर यांची तर उपसभापतीपदावर श्याम गायगोले यांची सोमवारी (दि. २१) निवड करण्यात आली. बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक झाली. यामुळे सहकार पॅनलचे अनेक वर्षांपासून असलेले वर्चस्व मोडीत निघाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत परिवर्तन पॅनलने दहा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व स्थापन केले होते. परंतु, सभापती-उपसभापतिपदासाठी अनेक जण इच्छुक असल्यामुळे अनेकांच्या या निवडीकडे लक्ष लागले होते. रविवारी बारा वाजताच्या सुमारास निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. तोपर्यंत सभापती-उपसभापतिपदाचे प्रस्तावित दावेदारांचे नावे जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

अखेर परिवर्तन पॅनलचे संजय रोहणकर यांचे नाव सभापती श्याम गायगोले यांचे नाव उपसभापतिपदासाठी जाहीर करण्यात आले. सहकार पॅनलच्या वतीने सभापतिपदासाठी बाळासाहेब पोटे उपसभापतिपदासाठी गजानन दुधाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हात वर करून मतदान घेण्यात आले. संजय रोहणकर श्याम गायगोले यांना प्रत्येकी अठरापैकी तेरा मते मिळाली. सहकार पॅनलचे पोटे दुधाट यांना प्रत्येकी पाच मते मिळाली. परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी रोहणकर गायगोले यांना विजयी घोषित केले.

गुप्तमतदानाची मागणी फेटाळल्याचा आरोप
कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या आजच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या पाच सदस्यांनी ही निवडणूक गुप्त पद्धतीने घ्यावी यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. परंतु, त्यांची ही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याचा आरोप सहकार पॅनलचे बाळासाहेब पोटे, गजानन दुधाट, सुधीर नवले, सीमा हाडोळे, प्रिया वानखडे यांनी केला.

जबाबदारी वाढली
सहकार पॅनलची सत्ता उलथून मतदारांनी परिवर्तनला संधी दिली.शेतमालावरील नफा कुरतडणाऱ्या यंत्रणा, शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी धार्जिणे धोरण याबाबत आता नवीन संचालक मंडळ काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बाजार समितीत शेतमालाचे सूर्यास्तापूर्वी वजन, काटे, चुकारे, मातेरा, तारण योजना आदी घटक शेतकऱ्यांचा नफा लुबाडणाऱ्या आहेत. याबाबत नवीन पदाधिकारी काय करणार याबाबतची उत्सुकता वाढल्याने पदाधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चतच वाढली आहे.