आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार, धरणांचे दरवाजे उघडले, पुरस्‍थिती कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवार (दि.४) मध्यरात्रीपासून अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत चातक बनलेल्या शेतकरी वर्गासह संपूर्ण ग्रामीण जनजीवन सुखावले आहे. तर रात्रीतून आलेल्या पावसामुळे उकाडा नाहीसा झाल्याने शहरातही आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, दर्यापूर, अचलपूर चांदूरबाजार तालुक्यांमधील पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात दोघेजण वाहून गेले असून, आपत्ती व्यवस्थापनाची चमू २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद या मुख्य पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. परंतु मंगळवारी सतत पडलेल्या पावसामुळे या पिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसाने हिरवळ तग धरेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहरातही गेल्या १५ दिवसांपासून लोकं उकाड्यामुळे त्रस्त होते. सोमवारी सायंकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली होती. दिवसभर शहरासह संपुर्ण जिल्ह्यात सतत पाऊस सुरु असल्याने काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. दर्यापूर, अचलपूर चांदूरबाजार हे तीन तालुके पूरग्रस्त झाले आहेत.परंतु, जिल्ह्यातील पूरस्थिती सध्या इतकी गंभीर नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
चाकर मान्यांची तारांबळ : शालेय विद्यार्थ्यांसाेबतच नाेकरदार वर्गालाही कार्यालय गाठताना माेठी कसरत करावी लागली. मागील दाेन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पाऊस इतका जाेर धरेल अशी शक्यता कमीच हाेती. मात्र पावसाने चांगलाच जाेर धरल्याने अनेकांना कार्यालय गाठताना पावसाचा सामना करावा लागला.

धामणगांव रेल्वे तालुक्यात पिकांना येणार गती : या पावसाळ्यातील पहिला झडीचा सुखद आनंद मिळाल्याच्या प्रतिक्रिया धामणगांवरेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी िदल्या आहेत. येथील नदीकाठच्या गावांना पुरासंदर्भात इशारा पुर्वसूचना प्रशासनाकडून मिळत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास जलसाठ्यात वाढ होणार आहे.

मुलांनी मारली दांडी : मंगळवारी मध्यरात्रीपासून दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस सुरु होता. यामुळे जिल्ह्यासह शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली. तर काहींनी शाळेत जाण्याच्या बहाण्याने पावसाचा अानंद लुटला. काही विद्यार्थ्यांनी शाळा संपल्यावर पावसाचा मनसोक्त आनंद लुटला. पावसात भीजत, एकमेकांच्या अंगावर पाणी फेकून कागदाचे नाव बनवून चिमुकल्यांनी हा आनंद साजरा केला. जागोजागी साचलेल्या डबक्यांमध्ये शाळकरी मुले पावसात खेळण्याचा आनंद लुटतांनाचे चित्र संपुर्ण शहरात बघायला मिळाले.

पिकांना दिलासा : सतत सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळालेला आहे. या संततधार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी िमळाली आहे. हा पाऊस शेतीसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. उशिरा झालेल्या पेरण्यांना या पावसाने दिलासा मिळणार आहे.
नियंत्रण कक्ष २४ तास सतर्क : मुसळधार पावसाने संपुर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशात जिल्हाधिकारी महानगरपालिका येथील नियंत्रण कक्ष २४ तास सतर्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध बचाव पथक तैनात आहे. पूरस्थितीमुळे कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेतात पाणीच पाणी : पावसाळा सुरु झाला तेव्हापासून मंगळवारी सतत १८ तासांहून अधिक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतांमध्ये पाण्याचे तळे साचले आहे. शहानूर धरणात ८० टक्के जलसाठा असून असाच पाऊस सुरु राहीला तर दरवाजे उघडे करण्याचे आदेश आल्याचे आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

एसटीच्या फेऱ्या रद्द : पावसामुळे जोगोजागी झाड पडल्याने आणि नदी नाल्यांना पूर आल्याने एसटींच्या फेऱ्यांवर परिणाम झाल्या आहेत. कोकर्डा मार्गे अंजनगाव, दहिहांडा मार्गे अकोला, लासूर मार्गे अकोला, अमरावती-खेड आणि अमरावती-नेरुळ गंगामाईयासह नांदगांव, माहुली, विचाेरी खेड आदी एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा
पावसामुळे दर्यापूर तालुक्यातील चंद्रभागा, शहानूर, पुर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. तालुक्यातील खरीप पिकांना हा पाऊस दिलासा देणारा आहे. पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रल्हाद धुर्वे यांनी दै. दिव्य मराठीशी बोलतांना दिल्याचे तालुका प्रतिनिधी धनंजय धांडे यांनी सांगितले.
आणखी दोन दिवस पाऊस
पुढील दोन दिवस पाऊस राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. ऑगस्टला मध्यम स्वरुपाचा पाऊस असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर ऑगस्टला तुरळक पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी
शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित
अनेक ठिकाणी उन्मळून पडली झाडे.
शाळकरी मुलांसह अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारली कार्यालयाला दांडी
पावसात अनेकांनी मारला गरमा गरम भजीवर ताव
अनेक शाळांमध्ये प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात आली सुटी
नुकसानीचा अाढावा घेणे सुरू

पावसामुळे जिल्ह्यात जे काही नुकसान झाले अाहे त्याचा अाढावा घेणे सुरू अाहे. दर्यापुरात एकजण वाहून गेल्याची माहिती अाली अाहे. अाम्ही २४ तास सतर्क अाहाेत. माेहन पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी,अमरावती.
मदतीसाठी प्रशासन सज्ज
जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता संबंधित विभागांसह आपत्ती व्यवस्थापन चमूला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षा ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन चमू २४ तास सतर्क आहे. किरण गित्ते, जिल्हाधिकारी
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मुसळधार पावसाचे फोटो ..