आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावतीत प्रेम प्रकरणातून भररस्त्यात चाकूने तरुणीची हत्या, अाराेपी फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या कायदेशीर व वैयक्तिक गुंतागुंतीतून प्रतीक्षा मुरलीधर मेहत्रे (२४,  रा. छाबडा प्लॉट) या तरुणीचा अमरावतीत भरदिवसा चाकूने गंभीर वार करून खून करण्यात अाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता साईनगर परिसरात घडली.  राहुल बबनराव भड (२५) या अाराेपीने हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात असून पाेलिस त्याचा शाेध घेत अाहेत.  


प्रतीक्षा ही अापली मैत्रीण श्वेता बायस्करसाेबत साईनगर भागातील मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास दर्शन करून या दाेघी परत येत हाेत्या. त्याचवेळी मागून दुचाकी घेऊन राहुल भड आला. राहुलने प्रतीक्षाच्या दुचाकीला धक्का मारून तिला दुचाकी उभी करायला भाग पाडले. त्याचवेळी राहुलने बॅगमधून चाकू काढून प्रतीक्षाच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर वार केेले व ताे पळून गेला. दरम्यान, श्वेताने आरडाओरड केल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या प्रतीक्षाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घाेषित केले.   


प्रतीक्षा आणि राहुल यांचे चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. यातूनच त्यांचा कायदेशीर वादही सहा महिन्यांपासून सुरू आहे. एप्रिल महिन्यात कौटुंबिक न्यायालयात राहुलने याचिका दाखल करून घेतली अाहे. त्यात प्रतीक्षा अापली पत्नी असून ती अापल्यासाेबत नांदत नसल्याची राहुलची तक्रार अाहे. मात्र प्रतीक्षाच्या वडिलांनी तसेच तिच्या वकिलांनी सांगितले की, प्रतीक्षाचे राहुलसोबत लग्न झालेच नव्हते. दरम्यान, राहुलने काही बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रतीक्षाच्या नावाने अकाउंट उघडून त्यावर टाकले आहे. या फोटोमुळे माझी बदनामी होत आहे. तसेच तो पाठलाग करतो आहे, अशी तक्रार प्रतीक्षाने पाेलिसात दिली हाेती. त्यावरून राहुलविरुद्ध ६ ऑक्टोबर २०१७ राेजी गुन्हा दाखल झाला होता. मात्र राहुलला पोलिसांनी अटक केली नव्हती.  दरम्यान, न्यायालय आणि पोलिसातून एकमेकांनी प्रकरण मागे घेण्याचे ताेंडी ठरवून राहुलला तूर्तास अटक करू नये, असे प्रतीक्षाने २६ ऑक्टोबरला पोलिसांना लेखी दिले हाेते. त्यानंतरही राहुलकडून प्रतीक्षाचा पाठलाग करणे, तिच्या नातेवाइकांना व तिच्या घरी जाऊन वडिलांना धमक्या देणे सुरूच होते. बुधवारी सायंकाळी सुद्धा प्रतीक्षाने फ्रेजरपुरा ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार दिली होती. 

 

लग्नाचे प्रमाणपत्र जप्त 
हल्ला करण्यापूर्वी प्रतीक्षा व राहूल यांच्यात  शाब्दिक बाचाबाची झाली हाेती. त्यानंतर प्रतीक्षाच्या मैत्रिणीने राहुलला हटकले, मात्र त्यावर अधिकच संतप्त झालेल्या राहूलने प्रतीक्षावर प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी राहूलच्या एका नातेवाइकाकडून राहुल व प्रतीक्षाच्या कथित लग्नाचे प्रमाणपत्र जप्त केल्याचे सांगितले जाते. 

बातम्या आणखी आहेत...