आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती- आता सीलबंद दुकानांमधील दारूसाठा ठेवणार ‘ट्रेड’ मध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्ह्यातील ३७३ मद्यपरवान्यांच्या नुतनीकरणालाही लागला ‘ब्रेक’ ; मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी लाखांची दारू पकडून दोघांना अटक केली होती. - Divya Marathi
जिल्ह्यातील ३७३ मद्यपरवान्यांच्या नुतनीकरणालाही लागला ‘ब्रेक’ ; मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी लाखांची दारू पकडून दोघांना अटक केली होती.
अमरावती- जिल्ह्यात अवैध दारूविक्री रोखण्यासाठी आता पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कंबर कसली आहे. शून्यसाठा नोंदवून सीलबंद केलेल्या दुकानातूनही लाखो रुपयांची दारू पोलिसांनी पकडल्यानंतर या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या दुकानातील साठ्याचे मोजमाप करून होलसेल विक्रेत्याच्या (ट्रेड) गोदामात साठवण्याचा निर्णय जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. दरम्यान, सीलबंद केलेल्या ३७३ दुकानांच्या परवाना नुतनीकरणालाही ब्रेक लावण्यात आला आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून एप्रिलपासून जिल्ह्यातील ३७३ दारू दुकान, वाईन शॉप, बार बंद झाले आहेत. या दुकानांमधील दारुसाठ्याची माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दुकाने सील केले आहेत तर ज्या दुकानात किंवा बारमध्ये शुन्य दारुसाठ्याची नोंद घेण्यात आली त्यापैकी काहींना सीलसुद्धा लावले नाही. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत देशी, विदेशी दारू विक्रीचे दुकान, बार असे एकूण ४९८ ठिकाण होते. राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत येणारे सर्व दारू विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश देऊन त्यांचा परवाना नुतनीकरण करू नये, असेही आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले होते. या आदेशाने जिल्ह्यातील ३७३ दुकान एप्रिलपासून बंद झाले. हे दुकान बंद करतेवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबधित दुकानात ३१ मार्चला शिल्लक असलेल्या दारुसाठ्याची माहिती घेऊन स्टॉक रजिस्टरला नोंद घेतली. त्यांनतर दारुसाठा असलेले दुकान, बार, वाईन शॉपी सील केल्यात. परवाना नुतनीकरण झाल्यामुळे या ३७३ दुकानमालकांना दारुची विक्री करता येत नाही. याच दरम्यान काही दारू दुकान, बार मालक यांच्याकडे ३१ मार्चला शून्य दारु असल्याची नोंदसुध्दा उत्पादन शुल्क विभागाने केली होती. अशा शून्य नांेदी झालेल्याच चार ठिकाणांहून ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४२ लाखांचा दारुसाठा जप्त केला आहे. यामध्ये मोर्शीचे तीन तर मंगरुळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीतील एका बारचा समावेश आहे. 
 
जिल्ह्यातील शेकडो दुकान, बारमध्ये, वाईन शॉपीमध्ये ३१ मार्चला लाखो रुपयांचा दारुसाठा होता. तशी नोंदही उत्पादन शुल्क विभागाने घेतली आहे. नोंद घेतल्यानंतर सदर दारुसाठा त्याच दुकानांमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात मागील वीस दिवसात झालेल्या पेालिस कारवाईतून सील केलेल्या दारू दुकानांमधून अवैध दारूविक्रीचे धक्कादायक प्रकार पुढे आले. त्यामुळे या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी शुक्रवारी (दि. ५) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंद असलेल्या दारू दुकान, बारमध्ये असलेला सर्व दारुसाठा ताब्यात घेऊन तो होलसेल विक्रेत्याच्या गोदामात किंवा परवानाधारक दारु व्यावसायिकाच्या सुरू असलेल्या दुकानात ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र बहुतांश दुकानातील दारुसाठा हा ताब्यात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाला होलसेल विक्रेत्याच्या गोदामात ठेवावा लागणार आहे. जिल्ह्यात सद्य स्थितीत तीन ट्रेड आहे. दुकान किंवा बारमध्ये असलेल्या दारुसाठ्याच्या नोंदी घेऊन हा माल न्यायालयाचा पुढील आदेश होईस्तोवर या गोदामात ठेवण्यात येणार आहे.

 
 
त्या दुकांनांना सीलच नाही 
३१ मार्चला ज्या दारुविक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दुकानातील दारुसाठा शुन्य आहे, असे सांगितले, त्यापैकी अनेक दारु दुकानांना सील लावलेले नाही. मात्र ज्या ठिकाणी दारुसाठा आहे, त्याठिकाणी सील केले आहे. मात्र शुन्य दारु साठा दाखवून तशी नोंद स्टॉक रजिस्टरला दाखवलेल्या चार ठिकाणांहून पोलिसांनी लाखोंचा दारुसाठा जप्त केला आहे, हे येथे उल्लेखनीय. 
 
आठवडाभर चालणार कारवाई 
-सद्या बंद असलेल्या दारु दुकान किंवा बारमध्ये दारुसाठा आहे, तो संपूर्ण साठा आम्ही ट्रेडमध्ये किंवा त्याच परवानाधारकाचे दुसरे वैध मार्गाने सुरू असलेले दुकान असल्यास त्या ठिकाणी ठेवणार आहे. या संदर्भात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले असून आठवडाभरात ही कारवाई पुर्ण करण्यात येणार आहे. प्रमोदसोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग,अमरावती. 
 
बातम्या आणखी आहेत...