आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानगरीत जणू अवतरली पंढरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘विठ्ठलनामाची शाळा भरली..विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..अवघे गर्जे पंढरपूर’ अशी विठुरायाची विविध भजने, गाणी नामस्मरणाने मंगळवारी मोठ्या उत्साहात भाविक पंढरपूरला रवाना झाले. मुखातुनी विठुनामाचा गजर, कपाळावर बुक्का, हातात झेंडे, टाळ-मृदंगाचा निनाद, पाऊली तसेच वारकरी सांप्रदायातील पोषाख परिधान करून शेकडो भाविक नया अमरावती रेल्वेस्थानक मध्यवर्ती बसस्थानकावर जमले होते. पंढरपूरला जाणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांची संख्या लक्षात घेता, वारकऱ्यांसाठी स्पेशल रेल्वे गाडीचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, मंगळवारी २१ जुलैला रेल्वेची ही स्पेशल गाडी राज्य परिवहन महामंडळाची तीन विशेष वाहने पंढरपूरला प्रस्थान झाली.

पाऊस लांबल्याने पंढरीला जाणाऱ्या भक्तांची संख्या रोडावेल, अशी चिन्हे होती. परंतु, शहरातून पंढरीला जाणाऱ्या पहिल्याच गाडीला भाविकांचा उदंड असा प्रतिसाद होता. दुपारी सव्वादोन वाजता नया अमरावती स्थानकावरून पंढरपूरसाठी ही स्पेशल गाडी सोडण्यात आली. भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवली. तत्पूर्वी नारळ फोडून रेल्वेचे चालक यांचे आैक्षण करण्यात आले. गाडी सुटण्याच्या दोन तासपूर्वीच भाविकांची जणूू यात्राच स्थानकावर जमली होती. सर्वांच्या मुखातून विठ्ठलाचे नामस्मरण होत असल्याचे चित्र होते, तर भाविकांमध्येही चैतन्य, उत्साह आनंदाचे वातावरण होते.

ऑडिआेरेकॉर्डरने वेधले लक्ष : अवघेगर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर...चल गं सखे चल गं सखे पंढरीला आदी रेकॉर्डरवर वाजणाऱ्या पांडुरंगाच्या विविध गाण्यांनी भाविकांचे लक्ष वेधले. संपूर्ण स्थानकावर विठुनामाचा गजर नामस्मरण असल्याने अपूर्व असे वातावरण होते. सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्सचे अरविंद हंबर्डे त्यांचे सहकारी हातात हे अॉडिआे रेकॉर्डर घेऊन संपूर्ण स्थानकावरून फिरत होते. प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचे नाव कानी पडावे, हा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

भजन म्हणत म्हणत जाते पंढरपूरला
मागील पाच वर्षांपासून वारीला जात आहे. पायदळ वारीला जायचे होते, परंतु यंदा जमले नाही. आषाढी एकादशी आली की उत्साह वाढतो. भक्तांचा जत्था सोबत असल्याने भजन गात पंढरपूर जायचे आहे. शकुंतला सोळंके.

पंढरपूरचा सोहळा पाहण्यासारखा
पंढरपूरचा सोहळा हा पाहण्यासारखा असतो. विठुराय दरवर्षी पंढरीला बोलवतो. यंदाचे हे ३६ वे वर्ष आहे. आषाढी एकादशी आली की पंढरपूर जाण्याची वेगळीच पर्वणी असते. नामस्मरणाने वातावरण मंगल होते. विनायक भुयार, धनेगाव.

वारीचे यंदाचे माझे हे ४२ वे वर्ष
१६रुपयांपासून वारीला सुरुवात केली होती. यंदाचे हे ४२ वे वर्ष आहे. जेव्हा वारी सुरू केली तेव्हापासून दरवर्षीच विठुराय पंढरीला बोलावतो आहे. वारीला जाण्याचा आनंद हा वेगळाच आहे. दामोधर भुयार, धनेगाव.

२० वर्षांपासून दरवर्षी पंढरपूर वारीला
मागील२० वर्षांपासून दरवर्षी पंढरपूर वारीला जात आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह कमी आहे. वेळेवर पाऊस पडला असता, तर वारकऱ्यांचा पंढरपूरवारीचा आनंद द्विगुणित झाला असता. नारायणसोळंके, इसापूर.