आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंदाजी, ज्युदो केंद्राच्या जागेवर वसतेय अनधिकृत झोपडपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापुढे शासनाने अद्ययावत तिरंदाजी ज्युदो केंद्र उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला दिलेली २८ हजार चौ. मी. जागा गत १९ वर्षांपासून तशीच पडून असल्यामुळे आता या ठिकाणी हळूहळू अनधिकृत झोपडपट्टीचे निर्माण होत असून, गत वर्षी केवळ सात-आठ झोपड्या या ठिकाणी होत्या. आता तेथे मोठ्या प्रमाणावर झोपड्यांचे निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील हजारो धनुर्धर ज्युदोपटूंवर त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
शासनाने सन १९९८ मध्ये जमीन उपलब्ध करून दिली, तरीही क्रीडानगरी अशी ख्याती असलेल्या अमरावती शहरातील डीएसओ कार्यालयाला काही अडचणींमुळे बायपासला लागून असलेल्या या जमिनीचा कोणताही उपयोग करून घेता आला नाही. सध्या तेथे अनधिकृत झोपडपट्टीही वसायला लागली आहे. जर तत्काळ या जागेच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली नाही, तर भविष्यात ही जागा मोकळी करून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे डीएसओंच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी आमचे कार्यालय पोलिस विभाग, तहसीलदार मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाची मदत घेणार असून, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

अमरावती शहरात सुमारे ७०० राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठ स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करणारे तिरंदाज आहेत. हजारो उदयोन्मुख धनुर्धर विविध अकादमींमधून तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत असतात. अमरावती विभागात सुमारे पाच हजार धनुर्धर असून, ते नियमितपणे सराव करतात. मात्र, सरावासाठी हक्काचे कोणतेही ठिकाण नाही. शासनाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी अमरावतीत असली, तरी ती खो-खो या खेळासाठी आरक्षित जागेवर सुरू आहे. बरे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक अंतर मिळेल एवढी जमीन येथे उपलब्ध नाही. बाजूलाच बास्केटबाॅल कोर्ट आहे. तेथील खेळाडू याच धनुर्विद्या रेंजवरून सतत जात-येत असतात. एकतर धनुर्धरांना खेळ थांबवावा लागतो किंवा बास्केटबाॅलपटूंना तरी जोवर तिरंदाज पूर्ण तीर सोडत नाहीत तोवर थांबून राहावे लागते. अशात जर एखादी दुर्घटना घडली, तर त्यासाठी जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तरही शासनालाच द्यावे लागणार आहे.

शासनालातीन कोटींचा प्रस्ताव पाठवला : तत्कालीनक्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी जागेची पाहणी केली. क्रीडा प्रबोधिनीसह अकादमीसाठी स्वतंत्र इमारत असावी, यासाठी कोटींचा प्रस्ताव पाठवला. याअंतर्गत स्वतंत्र वसतिगृह, ३०, ५०, ७० मी. अंतराचे आर्चरीचे स्वतंत्र रेंज, ज्युदो हाॅल, खानावळ, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे २५ ५० मी. आऊटडोअर शूटिंग रेंज उभारले जाणार आहे. या योजनेवर काम सुरू असल्याची माहिती डीएसओंनी दिली.

अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करू
^खेळाडूंसाठी तिरंदाजी ज्युदो केंद्र उभारण्याच्या दृष्टीने आरक्षित शासनाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस विभाग तहसीलदारांना पत्र देणार असून, मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाची मदत घेतली जाईल. अविनाश पुंड, जिल्हाक्रीडा अधिकारी, अमरावती.

केंद्राच्या प्रस्तावाचापाठपुरावा करणार
^शासनाने धनुर्विद्या प्रबोधिनी अकादमीसाठी दिलेल्या जागेबाबत ठराव झाला आहे. अमरावतीच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, त्याचा पाठपुरावा केला जाईल. तसेच अतिक्रमण तत्काळ काढून घेतले जाईल. डाॅ. जयप्रकाश दुबळे, क्रीडाउपसंचालक.

पुढे काय?
डीएसओ कार्यालयाने जर अतिक्रमण काढून त्याजागी तिरंदाजी ज्युदो केंद्र उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला, तर शहरात अद्ययावत असे धनुर्विद्या रेंज ज्युदो केंद्र तयार होऊन येथील खेळाडूंना त्याचा लाभ मिळेल. पडून असलेल्या जमिनीचाही चांगला उपयोग होईल. गुणी धनुर्धरांना पुणे, मुंबई, हैदराबाद या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. तसेच येथे सातत्याने राज्य, राष्ट्रीयच काय, पण आंतरराष्ट्रीय स्पर्धाही घेता येतील.