आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेदाराची जिद्द, दारूचे पाट वाहणारे गाव झाले आता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गावचेनाव रामगाव असले तरी, घरोघरी दारूच्या आहारी गेलेल्या माणसांमुळे गावात ‘राम’ उरला नव्हता. दिवसभराची मिळकत दारूत घालवून गावातील प्रत्येक घरगडी झिंगत झिंगत घरी घ्यायचा अन् मुलाबाळांना मारहाण करायचा. बापाला घाबरून पोरं सैरावैरा पळायची, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे उपाशीपोटी झोपायची...एका कनवाळू ठाणेदाराने हे विदारक चित्र पाहिले अन् ते बदलण्याचा निर्धार केला. प्रयत्नाअंती हळूहळू गावकऱ्यांचाही त्याला पाठिंबा मिळत गेला. सात वर्षांपूर्वी दारूचा पाट वाहणाऱ्या रामगावात आज दारूचा थेंबही मिळत नाही. दारूबंदीमुळे गावातील ९० टक्के भांडण, तंटे कमी झाले असून, गावकरी सुखी समाधानाचे जीवन जगत आहेत. जिद्दीने गावचे चित्र पालटणाऱ्या ठाणेदारांचे नाव अनिलसिंग गौतम असे असून, सध्या ते मंगरुळपीर जि. वाशीम येथे कार्यरत आहेत.
शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर १०० ते १२५ घरांचे रामगाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम ६००. गावात प्रत्येक एका घरामागे गावठी दारूची हातभट्टी. त्यामुळे दारूचे रामगाव, अशी या गावाची कुख्याती संपूर्ण जिल्ह्यात झाली होती. दारू काढणे आणि विकणे हा गावातील ७० टक्के नागरिकांचा प्रमुख व्यवसाय होता. मात्र, सात वर्षांपूर्वी नांदगावपेठ ठाण्याला ठाणेदार म्हणून आलेल्या अनिलसिंग गौतम यांनी संपूर्ण गावातून दारू हद्दपार केली इतकेच नाही तर गावातील नागरिकांना रोजगार देण्यासाठी काही प्रमाणात मदतही केली. त्यांना रामगाववासीयांनीही पाठिंबा दिला. परिणामी आज सात वर्षांनंतरही गावात दारूचा थेंबही मिळत नाही. पोलिस गावात जातच नव्हते, गेले तरी थातूरमातूर कारवाई करायचे आणि परत यायचे. त्यामुळे दारूचे गुत्ते जसे होते तसेच सुरू होते.

ठाणेदारांमुळेच गावात १०० टक्के दारूबंदी
सात ते आठ वर्षांपूर्वी आमच्या गावची ओळख दारूचे रामगाव अशी होती. दारूच्या व्यसनामुळे घरोघरी भांडणे होत होती. अनेकांचे संसार दारुमुळे उद््ध्वस्त झाले होते. मात्र, ठाणेदार गौतम यांच्यामुळेच गावात दारूचा व्यवसाय करणार नाही, असे गावकऱ्यांनी ठरवले. त्यामुळे आज गाव १०० टक्के दारूमुक्त झाले, असे पोलिस पाटील शालिनीताई इंगळे यांचे पती बाळू इंगळे यांनी सांगितले.

विदारक परिस्थिती पाहून घेतला निर्णय
^रामगावात ९० टक्के वाद हे दारूमुळे होत होते. शिवाय घरोघरी महिला लहान मुलांना दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते. ही विदारक स्थिती पाहून दारूबंदीचा निर्णय घेतला. या कामाला गावकऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे ते शक्य झाले. अनिलसिंग गौतम, तत्कालीनठाणेदार नांदगावपेठ.