आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात गाजली होती बापूंची हरिजन सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारीला देशभर हुतात्मा दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त अमरावती शहरातही ठिकठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी १९३३ मध्ये शहरात घेतलेली हरिजन सभा आणि त्यांच्या सन्मानार्थ उमरावती (त्या वेळी अमरावतीला उमरावती म्हणायचे) नगरपालिकेने अर्पण केलेल्या मानपत्राच्या स्मरणीयआठवणींना अनेक ज्येष्ठांनी उजाळा दिला आहे.
१६ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधीजी हे उमरावतीत होते. त्यांच्या स्वागतासाठी नगरी नवरीसारखी सजली होती. बापूंना मिरवणूक आवडत नसल्यामुळे वडाळी तलावासमोर सुंदर बैठक तयार करण्यात आली. तेथून पोहरा रोडपर्यंत रस्ता ध्वज पताकांनी शृंगारण्यात आला होता.
सन १९३० मध्ये वडाळी येथील ज्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला ते ठिकाण गांधीजींच्या नजरेस पडावे म्हणून तेथे एक उंच राष्ट्रीय निशाण उभारून ठेवण्यात आले होते. लोकप्रिय नेत्याला बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्वयंसेवकांनाही ती आवरत नव्हती. स. १०.३० वाजता गांधीजींचे आगमन झाल्यानंतर हरिजन सेवा संघातर्फे नानासाहेब ब्रह्म यांनी सुताचा हार अर्पण करून गांधीजींचे स्वागत केले. याप्रसंगी वीर वामनराव जोशी, ठक्कर बाप्पा, ब्रिजलाल बियाणी, दुर्गा जोशी, जगन्नाथ मालपाणी, बॅरि.ई. एम. जोशी तत्कालीन नेते उपस्थित होते.हजारो लोक या सभेला उपस्थित होते. गांधीजींची ही हरिजन सभा अनेक कारणांमुळे स्मरणात राहिली. त्यानंतर चित्रा टाॅकिजमागील मालाणी सेठ यांच्या गोदामात शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केले. दु. वाजता झालेल्या या सभेत पाच हजारांवर हिंदू-मुस्लिम समुदायाचे लोक एकत्र आले होते. गांधीजींनी हिंदीत भाषण सुरू केले. त्याचा मराठीत अनुवाद डाॅ. शिवाजीराव पटवर्धन करीत होते. बालकांनो खरे हरिजन व्हा. भेदभावाला थारा देऊ नका, असे महान नेत्याने त्या वेळी आवाहन केले होते. यानंतर गणेश नाटकगृहात स्त्रियांची सभा घेऊन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर नेहरू मैदानावर विराट सभा झाली होती.

महिलांनी दिले अंगावरील दागिने
बहिणींनो अस्पृश्यता, शिवाशिव याला थारा देऊ नका. हा धर्म नव्हे. मला हरिजनांच्या उद्धारासाठी दागिने, पैसे द्या, अजूनही बरीच कामे करायची आहेत, असे महिलांच्या सभेत राष्ट्रनेत्याने आवाहन केल्यानंतर महिलांनी हातातील अंगठ्या, दागिने, जवळ असतील तेवढे पैसे स्वयंसेवकांच्या हातावर ठेवले. चिपळूणकर यांनी तर हातातील पाटल्या हरिजनांच्या कार्यासाठी दिल्या. हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांनी शहराला दिलेल्या भेटीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

उमरावती नगर पालिकेचे मानपत्र
महात्माजींना मानपत्र देण्याचा ठराव उमरावती नगरपालिकेने सर्वानुमते मंजूर केला होता. त्याप्रमाणे नेहरू मैदानावरील जाहीर सभेत गांधीजींना नगरपालिकेतर्फे मानपत्र अर्पण करण्यात आले. हे इंग्रजी भाषेतील मानपत्र सभासद श्याम देशपांडे यांनी वाचून दाखवले. त्यानंतर चांदीच्या करंडकातून नगराध्यक्ष सेठ मिनामल मनभरदास यांनी ते बापूंना अर्पण केले.

पाच हजार हरिजन गरजूंना केले अन्नदान
गांधीजींच्या नगरात आगमनानिमित्त सेठ शिवनाथ बाबू यांनी पाच हजार हरिजन गरिबांना बडनेरा रोडवरील बंगल्यात अन्नदान केले. भोजनदानाचा कार्यक्रम सकाळी ते दु. पर्यंत सुरू होता. त्यांच्याच बंगल्यात बापूंच्या वास्तव्याची सोय करण्यात आली होती. या वास्तव्यादरम्यान गांंधीजींना हरिजन कार्यासाठी रुपयांच्या थैल्या अर्पण करण्यात आल्या होत्या.