आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात भाजपात अस्वस्थतेचे वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विविधसमित्यांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांचे अद्यापही झालेले पुनर्वसन, भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्कळीत कारभार, पुढाऱ्यांच्या आश्वासनांचा कार्यकर्त्यांना येणारा अनुभव आणि काँग्रेसच्या मोर्चाला जिल्ह्यातून मिळालेल्या भरगच्च प्रतिसादामुळे सत्तारूढ भाजपमध्ये सध्या अस्वस्थता पसरली असल्याचेच चित्र आहे.
भाजपचे राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर महिने उलटले तरीही विविध समित्या, महामंडळांवर अद्यापही कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची सुप्त लाट पसरली आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ असतानाही जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचेच कामे होत नाहीत तिथे कार्यकर्त्यांना वाव नसल्याची भावना अधिक घट्ट होऊ लागली आहे. भाजपच्या सरकारमध्ये जकातीच्याच दराने एलबीटीचे दर आकारण्यात येतील, अशी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, या दोन वेगवेगळ्या दरातील २१ महिन्यांच्या तफावत रकमेची थकबाकी व्यापाऱ्यांना भरावीच लागणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अमरावतीत सांगितले होते.

जकात एलबीटीमधील तफावत शुल्क रकमेतून पूर्वलक्षी प्रभावाने सूट मिळणार नसल्याने शहरातील व्यापारी समाधानी नाहीत. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रकाश पाटील भारसाकळे हे अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे भारसाकळे यांना अमरावती जिल्ह्यातील राजकारणात रुची नसल्याचेच मागील वर्षभरापासून दिसून येत आहे, तरीही भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची फेररचना अद्याप करण्यात आलेली नाही.

जिल्हाध्यक्षपद रिक्तच
जिल्हाध्यक्षपदावरअद्यापही कोणाची नियुक्ती झालेली नाही. डॉ. अनिल बोंडे, गजानन कोल्हे, निवेदिता चौधरी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर ही नावे जिल्हाध्यक्षपदाकरिता चर्चेत आहेत. मात्र, जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास खऱ्या अर्थाने कोण तयार आहे, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार
अमरावती पदवीधर मतदासंघातून निवडून आलेले डाॅ. रणजित पाटील हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, तर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आलेले आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे उद्योग राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे, तर मागील वर्षी भाजपमध्ये आलेले आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे, मेळघाटचे प्रभुदास भिलावेकर आणि दर्यापूरचे रमेश बुंदेले हे तीन आमदार आहेत.
बातम्या आणखी आहेत...