आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यात दहा बसपोर्ट उभारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘एइरपोर्टच्या धर्तीवर एसटी महामंडळाने राज्यात बसपोर्ट विकसित करण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात दहा शहरांतील बसस्थानके अत्याधुनिक करण्याची ही योजना आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच बसस्थानके आधुनिक स्वरूपाची होणार आहेत,’ अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकरराव रावते यांनी "दिव्य मराठी'ला दिली. राज्यातील बसस्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात येणार नाही, असे रावते यांनी सांगितले. तसेच राज्यातील सर्व बसस्थानकांचा विकास एसटी महामंडळ स्वत:च्या निधीतून करणार आहे. दरवर्षी प्रवासी करापोटी देण्यात येणारी पाचशे कोटींची रक्कम महामंडळाला बिनव्याजी उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त भांडवली खर्चही नियमित मिळणार आहे. या रकमेतून महामंडळ नव्या बसगाड्या आणि बसस्थानकांचा विकास करण्याची योजना आखत आहे.

आरामदायी गाड्या
राज्यातील खासगी बसेसच्या धर्तीवर नागपूर ते मुंबई अशा लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू करण्यात येणार आहेत. पुणे-मुंबई, नाशिक-मुंबई या मार्गावर सध्या काही आधुनिक आरामदायी गाड्या चालवण्यात येतात. याप्रमाणेच चार महिन्यांत अमरावती ते नागपूर नव्या आधुनिक आरामदायी बसेस सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महामंडळानेही आंतरजिल्हा आधुनिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे, असे रावते यांनी सांगितले.

एसटीचे रूप पालटणार
मागील १५ वर्षांत आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे महामंडळाचे नुकसान झाले. मात्र, आता येत्या काही वर्षांत एसटीचे रूप पालटणार आहे. एसटी कात टाकेल, अशी व्यवस्था करणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

काय अाहे याेजना?
एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला विमानतळावर असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. एअरपोर्टप्रमाणेच बसस्थानकाच्या इमारती सुसज्ज असतील. या इमारतीमध्ये आधुनिक वाचनालये, कॉफी हाऊस, सायबर कॅफे, बुक स्टॉल्स, वाहनतळ व्यवस्था अशा सर्वच सुविधा राहणार आहेत. विमानतळ आणि बसस्थानक सारखेच दिसतील, अशा पद्धतीने एसटी महामंडळाच्या स्थानकांचे रूप बदलण्यात येईल’, असे रावते यांनी सांगितले. ही बसस्थानके विकसित करण्याकरिता कंत्राटदार नेमण्यात येतील आणि निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत बसपोर्ट निर्मितीकरिता निविदा काढण्यात येणार आहे. सुरुवातीला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र येथील काही निवडक बसस्थानकांना बसपोर्टमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...