आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ली चोरल्यानंतर २० दिवसांनी चोरली कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका घरातून काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी अलिशान कारची किल्ली चोरली. त्यानंतर २० दिवसाने कार चोरली. नंतर याच कारचा वापर बकऱ्या चोरण्यासाठी केला. दरम्यान,पोलिसांनी ही कार चोरट्याला वर्धेत पकडले. तसेच त्या आधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी या चोरीत सहभागी असलेल्या इतर दोघांना शुक्रवारी ११ डिसेंबरच्या रात्री शहरात अटक केली. रुपेश राजू पाली (२७ रा. नागपूर), अतिश रामअवतार चौधरी (२३ रा. संजय गांधीनगर) आणि मयूर संजय डोंगरे (१८ रा. संजय गांधीनगर, अमरावती) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी ऑक्टोबर २०१५ ला राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छांगानीनगरमध्ये एका महिलेच्या घरात चोरी करून कारची किल्ली चोरली. दरम्यान, २० ऑक्टोबरला ही महिला कार घेऊन कलोतीनगरमधील कमलेश धनराज बिसेन यांच्या घरी गेली होती. तेथे कार घरासमोर उभी करून सर्व जण बाहेर गेले होते. दरम्यान, रात्री बिसेन घरी परतले असता तेथे उभी केलेली (एम. एच. २७ बीई १८००) नऊ लाखाची अलीशान दिसून आली नाही. त्यामुळे कमलेश बिसेन यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द चोरीची तक्रार दिली.दरम्यान, तीन दिवसांपूर्वी वर्धा शहरात पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी रुपेश पाली हा याच चोरीच्या कारने प्रवास करत होता. पोलिसांनी त्याला थांबवले असता त्याने पोलिसांच्या अंगावर कार चढवण्याचा प्रयत्न करून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला कारसह पकडले. वर्धा पोलिसांनी रुपेश पालीविरुध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कार जप्त केल्यानंतर ही कार अमरावतीतून चोरी गेल्याचे पुढे आले. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला वर्धेतून ताब्यात घेतले तसेच पोलिसांनी शहरातील अतिश मयूरलासुध्दा शुक्रवारी अटक केली. या तिघांनाही १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहीती फ्रेजरपुराचे ठाणेदार देवराज खंडेराव यांनी दिली. यात चोरी केलेल्या कारचा वापर बकऱ्या चोरून त्यांना वाहून नेण्यासाठी केल्याचे रुपेशने पोलिसांना सांगितले आहे. त्याने ही कार चोरल्यानंतर नागपूर वर्धा जिल्ह्यात बकऱ्यांची अनेकदा चोरी केली असे तपास अधिकारी एपीआय सतीश इंगळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...