आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Dead Rate High In 13 Taluqa At Maharashtra Compare To India

राज्यातील 13 तालुक्यांचा अर्भक मृत्युदर भारतापेक्षा जास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शून्यते एक वर्ष वयाच्या अर्भकांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्रातील १३ तालुक्यांचा अर्भक मृत्युदर हा भारताच्या अर्भक मृत्युदरापेक्षाही अधिक असल्याची धक्कादायक माहिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अर्भक मृत्युदर दरहजारी ४० एवढा आहे. मात्र, या १३ तालुक्यांतील अर्भक मृत्युदर ४० पेक्षाही अधिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या सरासरी २४ या अर्भक मृत्युदरापेक्षाही २२ तालुक्यांचा अर्भक मृत्युदर सातत्याने जास्त असल्याची नोंद राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मिशनच्या अहवालात घेण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व तालुके अतिजोखमीचे जाहीर करून राज्य सरकारने या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या दोन वर्षांच्या सरासरीमध्ये सातत्याने २४ पेक्षा अधिक अर्भक मृत्युदर कायम असलेले २२ तालुके राज्य सरकारने शोधले आहेत. तेथील आरोग्य सेवा-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तेथे विशेष आरोग्य दूतांद्वारे सेवा पुरविण्यास जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. गरोदर मातांना २४ तास आरोग्यसुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या २२ तालुक्यांमधील सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे सर्वेक्षण करून अहवाल पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत, तसेच जोखीम असलेल्या २२ तालुक्यांचे दैनंदिन आरोग्य अहवाल मागवण्यात आले आहेत, अशी माहिती अमरावतीचे आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देणार प्रगती अहवाल
याजोखमीच्या तालुक्यांतील माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस या तालुक्यांचा प्रगती अहवाल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथील आरोग्य मुख्यालयात देण्यात येणार आहे.
-डॉ. अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक, अमरावती विभाग

अतिजोखमीचे १३ तालुके : नाशिक,सुरगणा, गडचिरोली, चंद्रपूर, धानोरा, नंदुरबार, धारणी, चिखलदरा, घाटंजी, कळंब, अहेरी, कोरची आणि भामरागड या १३ तालुक्यांना अतिजोखमीचे तालुके जाहीर करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त झरी जामणी, जव्हार, मोखाडा, सालेकसा, चार्मोशी, कुरखेडा, शहापूर, सिरोंचा आणि अक्कलकुवा या तालुक्यांचाही समावेश जोखमीच्या तालुक्यांत करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात या बाबींचा समावेश
अतिजोखमीच्याआणि जोखमीच्या या सर्व २२ तालुक्यांमधील शिक्षण पद्धती, आहार नियोजन, आहार पुरवठा, रोजगार, बेरोजगारी, बालविवाह, गरोदर मातांची नोंदणी, जोखमीच्या गरोदर मातांची देखभाल या दृष्टीने व्यापक सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल पाठविण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या आरोग्य उपसंचालकांवर टाकण्यात आली आहे.
भारताचा अर्भक मृत्युदर ४० (दरहजारी जन्मानुसार)
महाराष्ट्राचा अर्भक मृत्युदर २४ (दरहजारी जन्मानुसार)