आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्यासाठी गेले कुटुंबाचे पालकत्व!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजेश पवार सीआयएसएफचा जवान. दोन वर्षांपूर्वी आजाराने लहान भावाचे निधन झाले. घरातील एकमेव कुटुंबाचा कर्ता खांब असलेल्या राजेशचाही मंगळवारी (दि. १७) कर्तव्यावर जातानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. राजेशच्या पार्थिवावर बुधवारी (दि. १८) अंत्यसंस्कार करण्यात आले. या दु:खद झटक्याने बडनेराची जुनी वस्ती आज गहिवरली.
बडनेरा जुनी वस्ती माळीपुरा येथील रहिवासी राजेश भाऊरावजी पवार हा जवान मुंबई येथे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)मध्ये कर्तव्यावर होते. दिवाळीच्या सुट्या आटोपून सोमवार, १६ नोव्हेंबरला राजेश हा पत्नी दोन मुलांसह अंबा एक्स्प्रेसने मुंबईला कर्तव्यावर जाण्यासाठी गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी पहाटे काळाने राजेशवर घाला घातला तो कायमचा परत येण्यासाठीच. छातीमध्ये दुखत असल्याचे राजेशला प्रवासात जाणवत होते, मात्र शरीरयष्टीनं धडधाकट असलेल्या राजेशने त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पत्नी दोन मुलांना कल्याण रेल्वेस्थानकावर उतरवून स्वत: रुग्णालयात पोहोचला. कल्याण येथील श्रीदेवी हाॅस्पिटलमध्ये त्याला काही कारणाने भरती होता आले नाही, वेळ जाऊ नये म्हणून त्याने पनवेल येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. या धावपळीमध्ये केवळ सहचारिणी, छोटा मुलगा मुलगी सोबत होते. आपले दुखणे साधे नाही हे राजेशला कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये कळून चुकले होते, त्यामुळे त्याने पनवेलला जाण्यासाठी रुग्णवाहिकेची मदत घेतली. राजेश पनवेलच्या रुग्णालयामध्ये पोहोचला खरा, मात्र तो तेथून परत येण्यासाठीच, यादरम्यान त्याने स्वत:च त्यांच्या सहकाऱ्यांना तब्बेतीबाबत माहिती दिली होती. त्याचे काही सहकारी पनवेल येथील रुग्णालयात पोहोचले, मात्र तोपर्यंत वेळ हातची निघून गेली होती. राजेशच्या अशा अचानक निघून जाण्याची वार्ता माळीपुऱ्यात पोहोचताच, अनेकांना धक्काच बसला. मनमिळाऊ स्वभावाचा राजेश १० ते १२ वर्षांपूर्वी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)मध्ये दाखल झाला होता. अनेक वर्षे चेन्नई येथे सेवा दिल्यानंतर राजेश सद्य:स्थितीत मुंबई येथे कार्यरत होता. मंगळवारी सकाळी मृत्यूनंतर राजेशचे पार्थिव आज पहाटे ५.३० च्या सुमारास बडनेरात आणण्यात आले. जुनी वस्ती येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध संघटनांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी मुलगा, असा परिवार आहे.

प्रशासनाकडून दखल नाही
प्रकृतीचीचिंता करता देश सेवेसाठी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी राजेश मुंबईत पोहोचला होता. मात्र, त्यापूर्वीच त्याला काळाने गाठले. कर्तव्यावर येत असताना प्रकृतीची िचंता करणाऱ्या राजेशची साधी दखलदेखील प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. येथील लोकप्रतिनिधींकडून राजेशच्या निधनाची वार्ता प्रशासनाला कळवण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून साधी दखलदेखील घेण्यात आली नाही. अखेर सोबत कर्तव्य बजावणारे सहकारी नामदेव शिंदे या सीआयएसएफच्या जवानानेच राजेशला पुष्पचक्र अर्पण करीत आदरांजली वाहिली.

आता उरल्या फक्त आठवणी
दिवाळीच्यादुसऱ्या दिवशी सावता मैदानात नरकासुर दहनाचा कार्यक्रम असल्याने राजेश सकाळपासूनच त्यात व्यस्त होता. शिवाय, कार्यक्रमामध्येदेखील आतषबाजी होत असताना फटाके फोडण्यात मदत केली. माळीपुरा येथून शेगावकडे पायी निघालेल्या वारीला निरोप देण्यासाठीदेखील राजेश आवर्जून उपस्थित होता. बडनेरापासून बऱ्याच लांबपर्यंत त्यानेदेखील पायदळ चालत सहभाग घेतला होता.
सीआयएसएफ जवान राजेश पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करीत बडनेरावासीयांनी आदरांजली वाहिली.
-------------------------