आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या मदतीसाठी ६१० मित्रांचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे, अशी पोलिसांची नेहमीच आेरड असते. काहीअंशी ते खरेही आहे. कारण बंदोबस्त, व्हीआयपींचे दौरे, गुन्ह्यांचे तपास, यांसह ऐनवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांना पोलिसांनाच तोंड द्यावे लागते. ही अडचण लक्षात घेता शहर पोलिसांच्या मदतीसाठी आतापर्यंत आयुक्तालयाच्या हद्दीत ६१० पोलिस मित्रांनी पुढाकार घेतला आहे.
पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस मित्रांची संकल्पना मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून अवघ्या १५ दिवसांत दहा ठाण्यांच्या हद्दीत तब्बल ६१० पोलिस मित्रांची नोंद झाली आहे. पोलिसांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात पोलिस मित्र काम करणार आहे. पोलिस मित्रांमध्ये अधिकाधिक समावेश हा महाविद्यालयीन विद्यार्थी तरुणांचा आहे.
त्यामुळे त्यांना पोलिसांच्या खाद्यांला खांदा लावून काम करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे पोलिसांनाही फायदा होणार आहे, शिवाय या तरुणांना शिकण्याची संधी मिळेल. तूर्तास पोलिस मित्रांची वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत घेण्यात येत आहे. मात्र, आगामी काळात पोलिस त्यांना महत्त्वाची जबाबदारी देणार आहे. ठाण्यातील पेालिसांसोबत रात्रीची गस्त, दिवसांची गस्त, मोबाइल व्हॅनमध्ये पोलिसांसाेबत हद्दीत गस्त, फिक्स पॉइंट आणि जनजागृती या पाच कामांसाठी मदत घेण्यात येणार आहे. आगामी काळात या पोलिस मित्रांना सक्रियपणे कामांसाठी घेण्यात येणार आहे. सध्या असलेली पोलिस मित्रांची संख्या ही आगामी काळात १,००० होणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिसांचे डोळे होतील पोलिस मित्र : सध्यापोलिसांना ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे शक्य नाही किंवा समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणे शक्य नाही. मात्र, ६१० पोलिस मित्रांमुळे साहजिकच पोलिसांना फायदा होणार आहे. कारण हे मित्र पोलिसांचे डोळे म्हणून काम करणार आहे. याचा फायदा पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तसेच गुन्हे घटवण्यासाठी होणार आहे, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

१,००० पोलिस मित्र होणार
^आमच्याकडे सध्या ६१० पाेलिस मित्रांची नोंद झाली आहे. वाहतुकीपासून ते जनजागृतीपर्यंतच्या कामासाठी आम्ही त्यांची मदत घेणार आहे. यामुळे आम्हालाही मदत होईल तसेच त्यांना कामांचा अनुभव येईल. या अनुभवाचा फायदा त्यांना भविष्यात होईल. आगामी काळात आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिस मित्रांची संख्या एक हजारपर्यंत जाणार आहे. सोमनाथ घार्गे, पोलिसउपायुक्त, अमरावती

पुढे काय?
पोलिस मित्रांना पोलिसांच्या सोबत काम करायचे आहे. मात्र, त्यापूर्वी या मित्रांना पोलिसांकडून कामांबाबत ज्या बाबी आवश्यक आहे त्या बाबींचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करताना नेमके काय करायला पाहिजे, हे त्यांना समजेल. त्यांच्यासाठी करावयाच्या कामकाजासंदर्भात प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस नियमावलीची माहिती दिली जाणार आहे, असे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

पोलिसठाणे मित्रांची संख्या
बडनेरा ७०
राजापेठ १२२
काेतवाली ९०
खोलापुरी गेट ६३
भातकुली १५
नागपुरी गेट ३०
वलगाव ५०
गाडगेनगर १५
फ्रेजरपुरा ५५
नांदगावपेठ १००
एकूण ६१०