आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानहून येणार अमरावतीत अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गोर गरीब रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत गरजेची असलेल्या सिटीस्कॅन मशीन खरेदीच्या प्रस्तावाला अखेर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावांतर्गत अडीच कोटी रुपयांच्या निधी वितरणाला बुधवारी (१७ मार्च) मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून मशीन खरेदीचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. जपानच्या तोशिबा मेडिकल सिस्टिम कार्पोरेशन या कंपनीकडून सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीकडे मशीन बसवण्याचे कंत्राट सोपवण्यात आले आहे. मे २०१६ च्या पहिल्या आठवड्यात ही सिटीस्कॅन मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयात बसवण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’ला दिली.

अॅलेक्सियन १६ असे सिटीस्कॅन मशीनचे हे नवीन अत्याधुनिक मॉडेल असणार आहे. यामुळे आता गोरगरीब रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातच सिटीस्कॅन काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन नसल्याने गोरगरीब आणि गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत होती. यामुळे कित्येक रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. या आर्थिक भुर्दंडातून रुग्णांची मुक्तता होण्यास मदतच होणार आहे. रात्री अपरात्री होणाऱ्या अपघातातील जखमींवर प्रभावी उपचार करणे शक्य होत नव्हते. प्रसंगी खासगी रुग्णालयांचा सहारा घ्यावा लागत होता. याकरिता कधी रुग्णांना तर कधी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनालाही आर्थिक बोजा सोसावा लागला. याकरिता अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी सातत्याने विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाद्वारे सिटीस्कॅन मशीनची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारनेही विशेष बाब म्हणून ठाणे, नाशिक, जळगाव, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील शासकीय रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मशीन बसवण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री प्रवीण पोटे आणि जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी तत्काळ हा प्रस्ताव मंजूर करून मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

एक लाख चित्रांची साठवण क्षमता
जिल्हा सामान्य रुग्णालयात बसवण्यात येणारी ही सिटीस्कॅन मशीन डिजिटल स्वरूपाची असणार आहे. मेंदू आणि शरीराच्या विविध भागातील स्कॅन केल्यानंतर सुमारे एक लाख चित्र साठवण करण्याची या मशीनमध्ये क्षमता आहे. ३६० अंशाच्या कोनातून अवघ्या ०.८ सेकंदाच्या किमान वेळेत या मशीनद्वारे स्कॅन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण शरीराचे स्कॅन या मशीनद्वारे करता येणार आहे.


बातम्या आणखी आहेत...